वृत्तसंस्था/ मुंबई
अलिकडे अत्याधुनिक सुविधासह सज्ज करण्यात आलेल्या जगातील सर्वात अधिक क्षमतेच्या अहमदाबादमधील सरदार पटेल स्टेडियमवर मुश्ताक अली चषक टी-20 क्रिकेट स्पर्धेतील बाद फेरीचे सामने खेळविले जाणार आहेत. ही स्पर्धा 2021 च्या क्रिकेट हंगामात पहिली राष्ट्रीय स्पर्धा असून ती 20 ते 31 जानेवारी दरम्यान होणार आहे.
या स्पर्धेच्या वेळापत्रकाबाबत बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी विविध राज्यांच्या क्रिकेट संघटना सचिवाना लेखी पत्राद्वारे माहिती दिली आहे. या स्पर्धेत सहभागी होणारे संघ सहा गटामध्ये विभागले जाणार असून त्यापैकी पाच इलाईट गट आणि एक प्लेट गट राहील. या स्पर्धेतील साखळी फेरीतील सामने मुंबई, चेन्नाई, कोलकोता, इंदोर, बडोदा येथे खेळविले जातील.
सय्यद मुश्ताक अली चषक टी-20 स्पर्धेने बीसीसीआयच्या 20-21 च्या क्रिकेट हंगामाला प्रारंभ होणार आहे. या स्पर्धेतील लीग गटातील सामन्यांना 10 जानेवारीपासून सुरूवात होईल. या स्पर्धेसाठी सहभागी होणारे संघ संबंधित यजमान शहरामध्ये 2 जानेवारीपूर्वी एकत्रित येणार आहेत. दरम्यान या स्पर्धेत सहभागी झालेल्या संघातील खेळाडूंना कोरोना संदर्भातील नियमांचे पालन करावे लागणार असून त्यांची कोरोना चांचणी आणि त्यानंतर क्वॉरंटाईन सक्तीचे राहील. प्लेट गटातील सामने चेन्नाईमध्ये खेळविले जाणार असून या ठिकाणी आठ संघाचे सामने होतील.
पाच इलाईट गटामध्ये प्रत्येकी सहा संघांचा समावेश असेल. या स्पर्धेच्या बाद फेरीला 26 जानेवारीपासून प्रारंभ होईल. 26 आणि 27 जानेवारीला उपांत्यपूर्व फेरीचे सामने, 29 जानेवारीला उपांत्य फेरीचे दोन सामने तर 31 जानेवारीला अंतिम सामना अहमदाबादच्या सरदार पटेल स्टेडियमवर खेळविला जाईल.
2, 4,. 6 जानेवारी रोजी या स्पर्धेत सहभागी होणाऱया क्रिकेटपटूंची तीनवेळा कोरोना चांचणी घेतली जाईल. तसेच स्पर्धेच्या बाद फेरी सुरू होण्यापूर्वी पुन्हा एकदा क्रिकेटपटूंची दोनवेळा कोरोना चांचणी घेतली जाईल. 20 आणि 22 जानेवारीला या कोरोना चांचणी घेतल्या जातील. कर्नाटकाचा संघ या स्पर्धेतील विद्यमान विजेता आहे. इलाईट अ गटामध्ये त्यांचा समावेश करण्यात आला आहे. कर्नाटकाचे सामने बेंगळूरमध्ये होतील. बलाढय़ मुंबई संघाचा इलाईट इ गटामध्ये समावेश करण्यात आला असून त्यांचे सामने मुंबई तसेच बंगाल संघाचा इलाईट ब गटात समावेश केला असून त्यांचे सामने कोलकोता येथे होतील.
इलाईट गट अ- जम्मू-काश्मीर, कर्नाटक, पंजाब, उत्तरप्रदेश, रेल्वे, त्रिपुरा (सर्व सामने बेंगळूरमध्ये)
इलाईट गट ब- ओदिशा, बंगाल, झारखंड, तामिळनाडू, आसाम, हैद्राबाद (सर्व सामने कोलकोतामध्ये).
इलाईट गट-क- गुजराथ, महाराष्ट्र, छत्तीसगड, हिमाचल प्रदेश, बडोदा, उत्तराखंड (सर्व सामने बडोदामध्ये).
इलाईट गट ड- सेनादल, सौराष्ट्र, विदर्भ, राजस्थान, मध्यप्रदेश, गोवा (सर्व सामने इंदोरमध्ये).
इलाईट गट ई- हरियाणा, आंध्रप्रदेश, दिल्ली, मुंबई, केरळ, पुडूचेरी ( सर्व सामने मुंबईत). प्लेट गट- चंदीगड, मेघालय, बिहार, नागालँड, मणिपूर, मिझोराम, सिक्कीम, अरूणाचल प्रदेश (सर्व सामने चेन्नाईत).