उत्तर प्रदेशातील नऊ जण ताब्यात : माहिती घेण्याचे काम सुरू : कॉल डिटेल्सही तपासणार
प्रतिनिधी/कोल्हापूर
दिल्लीतील तबलिगी जमातीच्या धार्मिक कार्यक्रमाला कोल्हापुरातून 19 जण गेले होते. तेथून कोल्हापूरला परतलेल्या दहा जणांचा जिल्हा प्रशासनाने शोध घेऊन त्यांना संस्थात्मक अलगिकरण कक्षात ठेवले आहे. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी पोलिसांनी मुस्लिम बोर्डिंगची अचानक तपासणी केली. यामध्ये बोर्डिंगच्या दुकानगाळय़ावर वरील बाजूस असणाऱया खोलीत राहत असलेल्या 9 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. हे सर्व जण उत्तर प्रदेशातील गाजियाबाद येथील असल्याचे सांगण्यात आले. या सर्वांना संस्थात्मक अलगिकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे.
स्थानिक गुन्हे अन्वेषणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तानाजी सावंत, लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल गुजर, शहर वाहतूक नियंत्रण पोलीस शाखेचे पोलीस निरीक्षक वसंत बाबर आणि त्यांच्या सहकाऱयांनी दिल्लीतील तबलिगी जमातीच्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या कोल्हापुरातील व्यक्तींच्या शोधासाठी शहरात तपासणी केली. यावेळी काही धार्मिक, प्रार्थनास्थळांचीही तपासणी करण्यात आली. मुस्लिम बोर्डिंगही तपासणी केली. यावेळी बोर्डिंगच्या दुकानगाळय़ावर असणाऱया खोलीत 9 व्यक्ती राहत असल्याचे स्पष्ट झाले. या व्यक्तींकडे पोलिसांनी चौकशी केली असता त्यांनी आपण उत्तर प्रदेशातील गाजियाबादचे असून वर्षभर कोल्हापुरात राहत असल्याचे सांगितले. तसेच कोल्हापुरात कपडे विक्री करत असल्याचीही माहिती त्यांनी पोलिसांना दिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दक्षतेचा भाग म्हणून या नऊ जणांना संस्थात्मक अलगिकरण कक्षात ठेवण्यात आले असून त्यांची वैद्यकीय तपासणीही करण्यात आली आहे.
मोबाईलचे कॉल डिटेल्स तपासणार
ताब्यात घेण्यात आलेल्या उत्तर प्रदेशातील 9 जणांनी आपण वर्षभर कोल्हापुरात राहत असल्याचा दावा केला आहे. या सर्वांचे मोबाईल नंबर पोलिसांनी घेतले असून या मोबाईल नंबरवरून या सर्वांचे कॉल डिटेल्स तपासले जाणार आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.