पुणे / वृत्तसंस्था
ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या भारतीय महिला बॉक्सर्स एमसी मेरी कोम व लवलिना बोर्गोहेन यांनी बुधवारी कोव्हिड-19 व्हॅक्सिनचा पहिला डोस घेतला. आगामी ऑलिम्पिक स्पर्धेत एमसी मेरी कोम 51 किलोग्रॅम वजनगटात तर लवलिना 69 किलोग्रॅम वजनगटात भारताचे प्रतिनिधीत्व करणार आहे.
मेरी कोम व लवलिना सध्या आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिटय़ूटमध्ये सराव करत असून त्यांचे हे सराव शिबिर जुलैअखेरपर्यंत चालणार आहे. मेरी कोम व लवलिना यांच्यासह प्रशिक्षण व साहायक पथकातील 4 सदस्यांनी देखील यावेळी पहिला डोस घेतला.
दोनवेळा विश्व कांस्यजेतेपद संपादन करणारी लवलिना काही कालावधीपासून येथे सराव करत आहे तर सहा वेळची वर्ल्ड चॅम्पियन मेरी कोम दि. 5 मे रोजी येथे पोहोचली आहे. 60 किलोग्रॅम वजनगटातून पात्रता संपादन करणारी सिमरनजीत कौर देखील येथेच सराव करेल. पण, त्यापूर्वी तिला कोरोनातून सावरल्यानंतर आयसोलेशन पूर्ण करावे लागणार आहे.
सध्या सर्व मुष्टियोद्धय़ांना तीन वेगवेगळय़ा गटात विभागले गेले असून इन्फेक्शनचा धोका शक्य तितका कमी करण्याचे प्रयत्न केले गेले आहेत. 75 किलोग्रॅम वजनगटातील पूजा रानी ही देखील ऑलिम्पिकसाठी पात्र ठरली असून तूर्तास ती बळळारी येथेच इन्स्पायर इन्स्टिटय़ूट ऑफ स्पोर्ट्समध्ये सराव करत आहे. यापूर्वी नवी दिल्लीत 21 मुष्टियोद्धय़ांचे प्रशिक्षण शिबिर भरवले गेले होते. पण, हाय परफॉर्मन्स डायरेक्टर राफेले बर्गमॅस्को व मुख्य प्रशिक्षक मोहम्मद अली कमर यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने त्या शिबिराचा फज्जा उडाला. दि. 14 एप्रिल रोजी त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. नंतर या दोघांनीही कोरोनावर मात केली आहे.