बंदूक हाती घेणाऱयांचे केले समर्थन
श्रीनगर
जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी सोमवारी चिथावणीखोर वक्तव्य करत केंद्रशासित प्रदेशात बंदूक हाती घेणाऱयांचे समर्थन केले आहे. नोकरीच नसल्यास काश्मीरमधील युवक बंदुकच हाती घेणार, असे त्यांनी म्हटले आहे. कलम 370 हटविल्यावर जम्मू-काश्मीरची जमीन आणि नोकरी हिसकाविण्याचा भाजपचा डाव आहे, डोगरा संस्कृती वाचविण्यासाठीच कलम 370 होते, असा दावा मुफ्ती यांनी केला आहे. सध्या भाजपची चलती आहे, पण भविष्यात आम्ही वरचढ असू. भाजपचीही ट्रम्प यांच्यासारखी स्थिती होणार आहे. सीमेवरील रस्ते खुले व्हायला हवेत. जम्मू-काश्मीर दोन्ही देशांमधील शांततेचा सेतू ठरावा. आमचा झेंडा आम्हाला परत देण्यात यावा, आम्ही एकत्रितपणे निवडणूक लढत आहोत. जम्मू-काश्मीरचे तुकडे करणाऱया शक्तींना दूर करण्यासाठी आम्ही हातमिळवणी केल्याचा युक्तिवाद पीडीपी प्रमुखांनी केला आहे. काँग्रेस देखील गुपकारचा हिस्सा असल्याचे नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांनी म्हटले आहे. अब्दुल्लांच्या या टिप्पणीमुळे काँग्रेसची चांगलीच गोची झाली आहे. जम्मू-काश्मीरचे काँग्रेस अध्यक्ष जी.ए. मीर यांनी भेट घेत एकत्रित निवडणूक लढविण्याची ग्वाही दिली आहे. काँग्रेस गुपकार आघाडीत सामील असून यासंबंधी गैरसमज होऊ नये, असे अब्दुल्ला यांनी म्हटले आहे.