दोन लाख बांधकाम कामगारांना मिळणार लाभ, ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन
प्रतिनिधी /बेळगाव
बांधकाम कामगारांचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी कामगार आयुक्त कार्यालयाकडून बांधकाम क्षेत्रातील कामगारांना मोफत बसपास देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बांधकाम कामगारांना दिलासा मिळाला आहे. बांधकाम क्षेत्रात काम करणाऱया कामगारांना देण्यात येणाऱया मोफत बसपासची प्रक्रिया कशा पद्धतीने राबवावी, याबाबत सोमवारी परिवहन मंडळाच्या कार्यालयात बैठक झाली. यावेळी या बसपासबाबत विभागीय नियंत्रण अधिकारी पी. वाय. नाईक, कामगार खात्याचे उपायुक्त व्यंकटेश शिंदीहट्टी, विभागीय संचार अधिकारी के. के. लमाणी आदींनी चर्चा करून ऑनलाईन पद्धतीने बसपास प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतला.
बांधकाम क्षेत्रात काम करणाऱया कामगारांना त्यांच्या राहत्या ठिकाणापासून कमाल 45 किलोमीटर अंतरापर्यंत मोफत प्रवास करता येणार आहे. जिल्हय़ात 2,06,096 बांधकाम कामगारांची नोंद आहे. या सर्व कामगारांना आता मोफत प्रवास करता येणार आहे. बांधकामावर जाणाऱया कामगारांना दैनंदिन वेगवेगळय़ा ठिकाणी प्रवास करावा लागतो. अशावेळी हा पास उपयुक्त ठरणार आहे. बांधकाम क्षेत्रात पुरुषांबरोबर महिलांची संख्या देखील अधिक आहे. अशा महिलांनाही या बसपासच्या माध्यमातून मोफत प्रवास करता येणार आहे. बांधकाम क्षेत्रात काम करणाऱया कामगारांना कामासाठी विविध ठिकाणी फिरावे लागते. दरम्यान काही कुटुंबे बांधकाम क्षेत्रात काम करतात. या कुटुंबीयांना देखील या पासचा लाभ होणार आहे. संबंधित बांधकाम कामगारांनी जवळच्या ग्राम वन कार्यालयात किंवा बेळगाव वन कार्यालयात ऑनलाईन अर्ज करावा, असे आवाहन केले. कामगारकार्ड, आधारकार्ड, रेशनकार्ड एका फोटोची पूर्तता करणे आवश्यक आहे. ऑनलाईन अर्ज केलेल्या केंद्रातूनच पासचे वितरण होणार आहे.
पहिल्या टप्प्यात तीन महिन्यांसाठी मोफत बसपास
पहिल्या टप्प्यात तीन महिन्यांसाठी मोफत बसपास दिला जाणार आहे. त्यानंतर बसपासचे नूतनीकरण करून मुदत वाढविली जाणार आहे. या पासच्या माध्यमातून आराम बस वगळता इतर बसमधून प्रवास करता येणार आहे. कोरोनामुळे बांधकाम क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. या व्यवसायावर अवलंबून असलेल्या कामगारांना देखील याची झळ सोसावी लागली आहे. अशा परिस्थितीत कामगार आयुक्त कार्यालयाकडून मोफत बसपास देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे बांधकाम कामगारांना दिलासा मिळाला आहे.