पेडणे, दोडमार्ग / प्रतिनिधी
मोरजी येथे शनिवारी रात्री उशिरा स्वयं अपघातात विनोद भांबादेव गवस, (वय 30 रा. फणसवाडी, मांगेली, सिंधुदुर्ग) या युवकाचा जागीच मृत्यू झाला.
विनोद गवस हा कामानिमित्त गोव्यात होता. शनिवारी 12 रोजी रात्री 11 च्या दरम्यान दाभोळकरवाडा मोरजी येथे त्यांचा स्वयं अपघातात झाला. जीए.03 एच. 8812 या गाडीने विनोद मोरजीहून अश्वेमार्गे जात होता. गाडीवरील ताबा गेला असताना त्याची गाडी दगडावर बसल्यानंतर त्याचा तोल गेल्याने त्याने डिव्हायडरला धडक दिली. तो गंभीररित्या जखमी झाल्याने घटनास्थळीच त्याचा मृत्यू झाला.
अपघाताची माहिती पेडणे पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी 108 रुग्णवाहिकेला कळवल्यानंतर त्यांनी तुये पेडणे येथील रुग्णालयात मृतदेह नेला. त्यानंतर सदर मृतदेह गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात शवचिकित्सेसाठी पाठवण्यात आला.
मयताची ओळख त्याच्याकडे सापडलेल्या ओळखपत्रावरून झाली. घटनेची माहिती त्यांच्या कुटुंबियांना कळवल्यानंतर शवचिकित्सेनंतर मृतदेह त्यांच्या कुटुंबियांकडे रविवारी सुपूर्द करण्यात आला. त्याच्या पश्चात आई-वडील, दोन भाऊ असा परिवार आहे. विनोदचा मृतदेह मांगेली फणसवाडी येथील घरी नेण्यात आल्यानंतर त्याच्या कुटुंबियांनी एकच आक्रोश केला. त्याच्यावर दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. विनोदच्या निधनाने मांगेली गावावर शोककळा पसरली आहे.