प्रतिनिधी/ धारबांदोडा
मोले येथील भगवान महावीर अभयारण्यात पट्टेरी वाघाचे अस्तित्व असल्याचे सिद्ध झाले आहे. या अनुषंगाने मोले वन खात्याने स्थानिक पंचायतीना पत्र पाठवून स्थानिकांनी लाकडे आणण्यासाठी व गुरांना चरण्यासाठी या भागात जाऊ नये तसेच लोकांमध्ये जागृती करण्याचे निर्देश दिले आहे. दूधसागर टूर ऑपरेटर्स असोसिएशनला हे पत्र पाठवले असून लोकांमध्ये जागृती करण्याचे सूचित करण्यात आले आहे.
राज्यात गेल्या काही दिवसापासून व्याघ्रगणना सुरू आहे. त्या अनुषंगाने पडताळणी करीत असताना मोले अभयारण्यात वाघांचा अधिवास असल्याचे सिद्ध झाले आहे. वाघाकडून नागरिकांवर हल्ले होण्याची शक्यता लक्षात घेऊन वन खात्याने स्थानिक पंचायतीने आपल्या परिसरात वाघाच्या अस्तित्वाबद्दल जागृती करावी आणि नागरिकांनी मोले अभयारण्यात परिसरात जाऊ नये या हेतूने हे पत्र पाठवण्यात आले आहे. मोले वनजीव विभागाचे वनधिकारी सिद्धेश नाईक यांनी यासंदर्भात पत्र पंचायत व टूर ऑपरेटर्सला पाठवले आहे.