नवी दिल्ली / वृत्तसंस्था
क्रिकेट विश्वातील सर्वात ग्लॅमरस व गर्भश्रीमंतीचे द्वार खोलून देणाऱया इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) स्पर्धेत सहभागी झालेले आणखी दोन क्रिकेटपटू कोरोनाने ग्रस्त झाले असून यात सनरायजर्स हैदराबादचा वृद्धिमान साहा व दिल्ली कॅपिटल्सचा फिरकी गोलंदाज अमित मिश्रा यांचा समावेश आहे. साधारणपणे महिनाभरापासून ही स्पर्धा सुरळीत सुरु होती. मात्र, मागील आठवडय़ापासून काही खेळाडू व प्रशिक्षण पथकातील सदस्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर याचा थेट स्पर्धेलाच फटका बसला आहे.
मंगळवारी सनरायजर्स हैदराबाद संघाचा यष्टीरक्षक-फलंदाज वृद्धिमान साहा तसेच दिल्ली कॅपिटल्सचा फिरकी गोलंदाज अमित मिश्रा हे कोरोनाबाधित असल्याचे अहवालातून निष्पन्न झाले आणि त्यानंतर तातडीने पुढील कार्यवाही सुरु झाली. साहा व मिश्रा कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आल्यानंतर या उभयतांच्या संघातील सर्व सदस्य आयसोलेशनमध्ये गेले आहेत.
यंदाच्या आयपीएल स्पर्धेला सातत्याने खेळाडू तसेच पदाधिकारी कोरोनाबाधित होत राहिल्याने बराच फटका बसला. स्पर्धा सुरु होण्यापूर्वी काही खेळाडूंनी कोरोनाच्या भीतीमुळे माघार घेणे पसंत केले तर काही खेळाडू निगेटिव्ह रिपोर्ट घेऊन हॉटेलमध्ये उतरल्यानंतर काही दिवसात कोरोना पॉझिटिव्ह झाल्याचे आढळून आले.
अगदी अलीकडे चेन्नई सुपरकिंग्सचे गोलंदाजी प्रशिक्षक लक्ष्मीपती बालाजी यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने चेन्नई सुपरकिंग्स व राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामना लांबणीवर टाकला गेला. सोमवारी देखील केकेआर व आरसीबी यांच्यातील लढत केकेआरचे गोलंदाज संदीप वॉरियर व वरुण चक्रवर्ती हे दोन खेळाडू कोरोनाबाधित असल्याचे आढळून आल्यानंतर रद्द करावी लागली होती.
यंदा आयपीएल स्पर्धेत कोरोनाची बाधा झालेले खेळाडू व पदाधिकारी
देवदत्त पडिक्कल (आरसीबी)
नितीश राणा (केकेआर)
डॅनिएल सॅम्स (आरसीबी)
ऍनरिच नोर्त्झे (दिल्ली कॅपिटल्स)
किरण मोरे (मुंबई इंडियन्स यष्टीरक्षण प्रशिक्षक)
अक्षर पटेल (दिल्ली कॅपिटल्स)
लक्ष्मीपती बालाजी (चेन्नईचे गोलंदाजी प्रशिक्षक)
वृद्धिमान साहा (सनरायजर्स हैदराबाद)
अमित मिश्रा (दिल्ली कॅपिटल्स).