फ्रेंच अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशी फोनवरून चर्चा ः युक्रेनच्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी रशियाचे सैन्य प्रयत्नशील असल्याचा दावा
रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांनी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशी फोनवरून चर्चा केली आहे. यादरम्यान पुतीन यांनी युक्रेनवर युद्धगुन्हय़ांचा आरोप केला आहे. रशिया युक्रेनमध्ये सर्वसामान्य नागरिकांना मृत्यूपासून वाचविण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करत आहे. याकरता ह्युमॅनिटेरियन कॉरिडॉर तयार करण्याचे प्रयत्न देखील सामील असल्याचा दावा पुतीन यांनी केला आहे.
पुतीन आणि मॅक्रॉन यांच्यातील चर्चेसंबंधी रशियाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार फ्रान्सच्या अध्यक्षांना युक्रेनच्या सुरक्षा दलांकडून दररोज होणाऱया युद्धगुन्हय़ांची माहिती जाणीव करून देण्यात आली. युक्रेनने विशेषकरून डोनबास भागातील शहरांवर मोठय़ा प्रमाणावर रॉकेट हल्ले केले आहेत, असे रशियाने म्हटले आहे. डोनबासचा एक हिस्सा रशियाचे समर्थनप्राप्त फुटिरवाद्यांच्या ताब्यात आहे.
ब्लादिमीर पुतीन यांच्यावर यापूर्वीच युद्धाचे नियम मोडण्याचा आरोप पाश्चिमात्य देशांकडून करण्यात आला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांनी शुक्रवारी पहिल्यांदाच जाहीरपणे ब्लादिमीर पुतीन यांना ‘युद्धगुन्हेगार’ असे संबोधिले होते.
मॅक्रॉन आणि पुतीन यांच्यातील ही चर्चा फ्रान्सच्या पुढाकाराच्या अंतर्गत झाली आहे, यात युक्रेनमधील युद्ध संपविण्यासाठी मॉस्को आणि कीव्हदरम्यान होत असलेल्या चर्चेचा मुद्दा सामील होता. युद्ध संपविण्यासाठी मॅक्रॉन यांनी अनेकदा वैयक्तिक स्वरुपात आणि फोनवर पुतीन यांच्यासोबत चर्चा केली आहे. राजनयिक संवादाद्वारे मुद्दे निकालात काढले जावेत, असा मॅक्रॉन यांचा प्रयत्न आहे.
मारियुपोलसंबंधी चिंता
एक तास 10 मिनिटांपर्यंत चाललेल्या चर्चेदरम्यान मॅक्रॉन यांनी युक्रेनच्या दक्षिणेकडील मारियुपोल शहरासंबंधी चिंता व्यक्त केली आहे. हे शहर रशियाच्या हल्ल्यांनी सर्वाधिक प्रभावित आहे. शहराला 2 मार्चपासूनच रशियाच्या सैनिकांनी घेरले आहे. मारियुपोलमध्ये वीज, पाणी, गॅस, मोबाइल नेटवर्क आणि अन्नपदार्थांचा पुरवठा देखील बंद आहे. येथील लोकसंख्या सुमारे 4.5 लाख इतकी आहे.
शहरात राहणाऱया लोकांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी ठोस पावले उचलली जावीत, असे म्हणत मॅक्रॉन यांनी रशियाचा घेराव हटविणे आणि मानवी मदत पोहोचविण्याचे देखील आवाहन केले आहे.
काय आहे युद्धगुन्हा?
युद्धादरम्यान एखादा देश अत्यंत घातक बॉम्बचा वापर सर्वसामान्य नागरिक, नागरी वस्ती, शाळा किंवा रुग्णालयांना लक्ष्य करण्यासाठी करत असल्यास त्याच्या विरोधात हेग कन्व्हेंशन 1899 आणि 1907 अंतर्गत युद्धगुन्हय़ाचा खटला चालविला जाऊ शकतो. युद्धगुन्हा हा युद्धाच्या नियमांचे उल्लंघन असतो, याच्या अंतर्गत जाणूनबुजून नागरिकांना मारणे किंवा जाणूनबुजून युद्धकैद्यांना ठार करणे, यातना देणे, ओलीस ठेवणे, नागरिकांच्या मालमत्तेला अनावश्यक स्वरुपात नष्ट करणे, युद्धादरम्यान लैगिंक अत्याचार, लूट, सैन्यात मुलांची भरती, नरसंहार इत्यादी गुन्हे सामील आहेत.