एनआरआय आयुक्त ऍड.सावईकरतर्फे स्वागत
प्रतिनिधी /फोंडा
रशिया-युक्रेन यांच्यातील युद्धस्थितीमुळे अडकलेली फोंडयातील युवती कॅरन फर्नाडीस काल गुरूवारी वरचा बाजार फोंडा येथील घरी सुखरूप पोचली. युक्रेन येथे मेडीकलच्या शेवटच्या वर्गात ती शिक्षण घेत आहे. एनआरआय आयुक्त ऍड. नरेद्र सावईकर यांनी कॅरन याच्या घरी भेट देत तिचे स्वागत केले. तिच्याकडून युक्रेनचे अनुभव जाणून घेतले तसेच घरी चिंतेत असलेल्या माता-पित्याना दिलासा दिला.
यावेळी बोलताना ऍड. सावईकर म्हणाले की युक्रेन येथे गोव्यातील एकूण 19 विद्यार्थी शिक्षणासाठी गेले होते. सद्यपरिस्थितीत 13 जणांशी संपर्क झालेला आहे. त्यापैकी 7 जण गोव्यात पोचलेले आहे. अडकलेल्यापैकी काहेंनी रोमानिया व हंगेरी सीमारेषा पार केलेली आहे. येत्या चार पाच दिवसात तेही विद्यार्थी गोव्यात पोचेल अशी ग्वाही एनआरआय आयुक्त नरेंद्र सावईकर यांनी दिली. अडकलेल्य़ांना सुखरूप घरी आणण्यासाठी सरकारचे सर्व प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी सरकारी अधिकारी विद्यार्थी व पालकांच्या कायम संपर्कात असून कुणीही चिंता करू नये असे सावईकर म्हणाले.