जगन्नाथ मुळवी /मडकई
कोरोनाच्या थैमानातून 1 लाख 65 हजारांच्यावर कोरोना बाधीत झाले. त्यात तीन हजाराचा आकडा पार करीत बळी गेले. 15 महिने शिक्षण, आरोग्य, कला, क्रिडा अशी सर्वच क्षेत्रे कोरोनाने कुस्करून टाकली. ही पार्श्वभूमी समोर असतानाही नागरिक लस घेण्यास पूढे येत नसल्याने ‘एशिया ऑफ रिकॉर्ड’मध्ये नाव नोंद झालेले रांगोळी कलाकार आकाश पुरूषोत्तम नाईक व त्यांची शिष्या सौरक्षा रमाकांत नाईक यांनी एक ज्येष्ठ महिला लस घेतानाची रांगोळी चितारून जनजागृती केली आहे.
गाळशिरे कवळे येथील 26 वर्षीय युवक आकाश नाईक व 21 वर्षी सौरक्षा नाईक यांनी कवळेच्या दत्तमंदिरच्या सभागृहात ही रांगोळी घातलेली आहे. ज्येष्ठ महिला लस घेतानाचा तिचा निर्वीकार चेहरा पाहून ती कोरोनाशी आता लढा देण्यास सज्ज झालेली आहे, असे त्या उत्कृष्ट चितारलेल्या रांगोळीतून स्पष्ट होत आहे. कलेतून कोरोनाशी लढा देण्याची जागृती आकाश व सौरक्षा यांनी केली आहे. ती खरोखरच वाखाणण्याजोगी आहे. सरकारच्या टीका उत्सवाप्रमाणे सामाजिक जाण व भान ठेवून या कलाकारांनी काढलेली रांगोळी पाहण्यासाठी कलाप्रेमी आवर्जून येथे येत असतात. फोंडय़ाच्या जिल्हा इस्पितळाच्या डॉ. स्मिता पार्सेकर व कवळे ग्रामपंचायतीचे सरपंच राजेश कवळेकर, पंच सदस्य उषा नाईक यांनी या दोन्ही कलाकारांचा हा रांगोळीचा कलाविष्कार पाहुन त्यांच्या कलेवर स्तूतीसुमने उधळली. पूढील सरकारच्या जागृती कार्यक्रमात या दोन्ही कलाकारांनी अशीच रांगोळी घालून जनजागृती करण्यासाठी त्यांना सरकारच्या उपक्रमात सहभागी करून घेतले जातील, अशी प्रतिक्रीया डॉ. स्मिता पार्सेकर यांनी व्यक्त केली.
आकाश नाईक हा प्रचंड मोठय़ा ताकदीचा रांगोळी कलाकार आहे. रांगोळी विषयी खूप अंत्यत खोलीने अभ्यास करून ती तो घालीत असतो. यापूर्वी त्याने छोटय़ा चमच्यावर साईबाबांची रांगोळी घालून ‘एशिया ऑफ रिकॉर्ड’ केला होता. आकाशचे वडील पुरूषोत्तम यांनी 36 वर्षे लोकमान्य विद्यालयात सेवा बजावलेली आहे. त्यामूळे त्यांनी आकाशवर योग्य संस्कार केलेले आहे. त्यांचे मोठे बंधू उमेश कडून ही रांगोळीची कला त्यांनी आत्मसात केलेली आहे. थोरला बंधू काढीत असलेली रांगोळी पाहून त्यातले बारकावे शिकून घेतले व त्यांनीही रांगोळी घालायला सुरूवात केली. प्रथम पदरी अपयश आले. पण खचून न जाता. जिद्द व चिकाटीने परिश्रम करीत राहीला. मग मात्र यश आपोआप चालून आले. अनेक स्पर्धामधून आकाश नाईक यांनी पारितोषिके पटाकावली आहे. चमच्यावर रांगोळी काढणे हे किचकटीचे काम असते. पण कलाकार आकाशने ही रांगोळी काढून ‘एशिया’ ऑफ रिकॉर्ड’ केला. अशीच रांगोळी घालून त्यांची त्यांनी कला आंतर राष्ट्रीय पातळीवर नेऊन ठेवावी. कलाविष्कार दाखविताना सर्जनशिलता अत्यंत महत्त्वाची असते. आकाश वयाने खुप लहान असल्याने पूढील काळात त्यांना कलेच्या क्षेत्रात भरीव योगदान द्यायला संधी आहे. या संधीचे सोने करण्यासाठी त्यांना ही रांगोळी चितारत राहावी, अशा शुभेच्छा ही रांगोळी पाहण्यासाठी येणाऱयांकडून व्यक्त होत आहे. वेळीप कपिलेश्वरीची युवती सौरक्षा नाईक हीने या पूर्वी अनेक रांगोळी स्पर्धातून भाग घेतलेला आहे. तशीच बक्षिसेही प्राप्त केलेली आहे. बांदोडा येथील लोकमान्य मल्टीपर्पजने आयोजित केलेल्या रांगोळी स्पर्धेत तिला प्रथम पारितोषिक प्राप्त झाले हेते. ‘मगर’ ची थ्रीडी रांगोळी घालून तिने या क्षेत्रात महीलाही कमी नसल्याचे सिध्द करून दाखविलेले आहे. आकाश नाईक यांच्या रांगोळीच्या कार्यशाळेत रांगोळीचे बाराकावे सौरक्षाने शिकून घेतलेले आहे. सौरक्षा ही पीईएस कॉलेजची विद्यार्थीनी आहे. गुरूशिष्यांनी कोरोना लसीकरणाची रांगोळी कलेच्या माध्यमातून केलेली जागृती खरोखरच अलौकीक आहे. सरकारने रांगोळी कलाकारांसाठी व्यासपिठ मिळवून दिल्यास त्यांच्या कलेचे कौतुक होऊन. कलेच्या क्षेत्रात तिला दर्जात्मक स्थानही प्राप्त होऊ शकेल असे आकाश नाईक यांनी सांगितले.