बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकात झालेल्या मुसळधार पावसाने नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक गावात पाणी शिरले आहे. हजारो हेक्टर शेती पाण्याखाली असून पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. राज्यातील नेते पुरबाधित क्षेत्रांचा दौरा करत आहेत. दरम्यन कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी बुधवारी गुलबर्गा येथे हवाई सर्वेक्षण केले.
जिल्ह्यात मुसळधार पाऊस आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला. पाहणीदरम्यान त्यांच्यासमवेत गृहमंत्री बसवराज बोम्मई, पशुसंवर्धन मंत्री प्रभू चौहान आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आयुक्त मनोज राजन हे होते.
दरम्यान मुख्यमंत्री उत्तर कर्नाटकातील इतर जिल्ह्यांमध्ये हवाई सर्वेक्षण करणार आहेत. यामध्ये गेल्या आठवड्यात जी गावे पाण्याखाली गेली आहेत आणि पिकांचे नुकसान झाले आहे. अशा भागांची ते हवाई पाहणी करणार आहेत.