वीज बिल भरण्यासह अन्य व्यवहार शक्य
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
खासगी क्षेत्रातील प्रमुख बँक म्हणून ओळख असणाऱया येस बँकेकडून ग्राहकांसाठी डिजिटल व्यवहाराची सुविधा उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. डिजिटल व्यवहारास चालना देण्याच्या उद्देशाने डिजिटल वॉलेटचे सादरीकरण करण्याची घोषणा येस बँकेने केली आहे.
येस बँकेने आपली सेवा डिजिटलड वॉलेट युवा पे नावाने सादर केली आहे. बँकेने ही सुविधा डिजिटल वॉलेट युडीएमए टेक्नॉलॉजीसोबत भागीदारी करुन सादर केलीय. ही सेवा केवायसीसह ऍपचा वापर करुन वापरता येणार आहे. फिचर आणि स्मार्टफोन ग्राहकांना याचा वापर सहजपणे करता येणार असल्याचे बँकेने म्हटले आहे. या ऍपची गुगल पे आणि अन्य डिजिटल पेमेंटला टक्कर राहणार आहे.
सदर ऍपच्या माध्यमातून वीज बिल, पाणी बील, कर, एलपीजी गॅस नोंदणी, डीटीएच रिचार्ज, मोबाईल फोन, सोलर पार्क फी यासह अन्य सुविधा देण्याचा प्रयत्न येस बँक युवा पे च्या मदतीने करणार असल्याचे समजते.
पहिल्या टप्प्यातील सुविधा
देशामध्ये सुविधा देण्याची सोय बँकेने केली असून यात पहिल्या टप्प्यात 238 गावांमधील 158 ग्रामपंचायतींचे लोक या ऍपच्या आधारे आपले आर्थिक व्यवहार करणार असल्याचे सांगितले आहे. दुसऱया टप्प्यात 29 हजार गावांतील 6,200 ग्रामपंचायतींमध्ये या ऍपची सेवा देण्याचा प्रयत्न करण्यात येणार असून यामधून जवळपास 1.2 कोटी लोकांना या सुविधेचा लाभ घेता येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.