वार्ताहर / मौजेदापोली
दापोली तालुक्यातील भोपण येथील मुस्लिम मोहल्ला येथून नुसेबा सहीबोले वय वर्षे ६ ही बालिका १२ मार्च रोजी २.३० ते ३ वाजण्याच्या सुमारास बेपत्ता झाली होती. तिचा शोध पोलीस व स्थानिक ग्रामस्थ घेत होते. मात्र १४ मार्च रोजी दुपारच्या सुमारास भोपण खाडीत तिचा मृतदेह सापडून आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
याबाबतीत मिळालेल्या माहितीनुसार १२ मार्च रोजी दुपारी २.३० ते ३ वाजण्याच्या सुमारास भोपण मुस्लिम मोहल्ला येथे नुसेबा आणि तिचा भाऊ मोहम्मद सहीबोले हे दोघेही सायकल फिरवीत असता सायकल फिरवून झाल्यानंतर मोहम्मद सायकल ठेवण्यास घराकडे गेला त्यावेळी नसेबा तेथेच उभी होती. मोहम्मद सायकल ठेवून पुन्हा नुसेबाला घेण्यासाठी आला असता त्याला नुसेबा कोठेही आढळली नाही, म्हणून घरातल्या पालकांसह सर्वांनी गावात सर्वत्र शोधाशोध सुरू केली. मात्र तिचा शोध न लागल्यामुळे दाभोळ सागरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती.
दाभोळ पोलीस व स्थानिक ग्रामस्थ हे नुसेबा हिचा शोध घेत होते. मात्र रविवारी दुपारच्या सत्रामध्ये खाडीकडे तिचा मृतदेह दिसून आल्याने एकच खळबळ उडाली. एका ६ वर्षीय बालिका बघता बघता गायब झाली व दोन दिवसांनी तिचा मृतदेह खाडीत आढळल्यामुळे भोपणमध्ये दु:खाचे वातावरण आहे. लहान लहान मुली बेपत्ता होत असल्याचे प्रकार दापोली तालुक्यात वारंवार होऊ लागल्याने अनेकांनी चिंता व्यक्त केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास दाभोळ सागरी पोलीस ठाण्याचे अधिकारी करीत आहेत.