ऐतिहासिक कागदपत्रे उजेडात, 1912 साली डॉ. वॉन्लेसना दिली जमीन
राजर्षी शाहू स्मृतिदिन विशेष
मिरज / मानसिंगराव कुमठेकर
राजर्षी शाहू महाराजांनी मिरजेतील प्रसिध्द मिशन इस्पितळाला साडेसहा एकर जमीन देणगी स्वरुपात दिली होती. त्यासंदर्भातील सन 1912 चा पत्रव्यवहार उपलब्ध झाला आहे. कोल्हापूरचे तत्कालीन पोलिटीकल एजंट मेरीवेदर यांनी त्यासंदर्भात मिरज संस्थानला पाठविलेली पत्रे मिरज इतिहास संशोधन मंडळाचे अभ्यासक मानसिंगराव कुमठेकर यांना मिळाली आहेत. या पत्रांवरुन राजर्षी शाहूंनी डॉ. वॉन्लेस यांच्या वैद्यकीय कार्यात केलेल्या अमूल्य मदतीची माहिती मिळते.
कोल्हापूरचे राजर्षी शाहू महाराज हे महाराष्ट्रातील अग्रगण्य समाज सुधारक होते. समाजात वेगवेगळ्या स्तरातील लोकांना त्यांनी वेळोवेळी मदत केली. विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व्यक्ती, कलाकार, खेळाडू यांना सढळ हाताने देणग्या दिल्या. त्यांनी केलेल्या मदतीमुळेच कोल्हापूरसह महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी मोठ्या संस्था उभ्या राहिल्या. त्यांच्या काळात सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक सुधारणांचा पाया रचला गेला.
राजर्षी शाहू महाराज यांनी वैद्यकीय सेवा करीत असलेल्या मिशनरींना केलेली मदत ही सर्वश्रूत आहे. कोल्हापूर, कोडोली, मिरज येथील मिशनऱ्यांना त्यांनी आर्थिक मदतीशिवाय त्यांच्या संस्था उभारणीसाठी जमीनीही देणगी स्वरुपात दिल्या. मिरजेतील अमेरीकन प्रेसब्रिटेरियन संस्थेचे डॉ. विल्यम वॉन्लेस यांच्याशी राजर्षी शाहूंचे मित्रत्वाचे संबंध होते. डॉ. वॉन्लेस यांनी राजर्षी शाहूंच्यावर वेळोवेळी उपचार केले होते. डॉ. वॉन्लेस यांच्या पत्नी मेरी वॉन्लेस यांनी केलेल्या निरपेक्ष सेवेची आठवण ठेवून शाहू महाराजांनी कोल्हापूर येथे मेरी वॉन्लेस हॉस्पिटलची उभारणी केली.
डॉ. वॉन्लेस यांनी सन 1894 मध्ये मिरजेत भव्य अशा मिशन इस्पितळाची उभारणी केली. या इस्पितळात देशभरातून रुग्ण येत असत. वाढत्या रुग्णसंख्येमुळे डॉ. वॉन्लेस यांनी इस्पितळाचा विस्तार करायचे ठरविले. मात्र, त्यासाठी जागेची आवश्यकता होती. राजर्षी शाहूंच्या कानावर ही वार्ता गेल्यानंतर त्यांनी मिशन हॉस्पिटलच्या समोर असणारी सुमारे साडेसहा एकर जमीन डॉ. वॉन्लेस यांना देणगी स्वरुपात दिली.
सन 1912 साली राजर्षी शाहूंनी डॉ. वॉन्लेस यांना दिलेल्या या जमीनींसंदर्भातील पत्रव्यवहार नुकताच मिरज इतिहास संशोधन मंडळाचे अभ्यासक मानसिंगराव कुमठेकर यांना मिळाला आहे. यामध्ये सदर जमीनीची मिरज संस्थानिकांनी अधिकृत नोंदणी करुन द्यावी, यासाठी कोल्हापूर दरबार, तत्कालीन पोलिटिकल एजन्ट आणि मिरज संस्थानात झालेला हा पत्रव्यवहार आहे. दक्षिणी मराठा संस्थानचे तत्कालीन पोलिटिकल एजंट मेरीवेदर यांनी दोन डिसेंबर 1912 रोजी मिरज संस्थानिकांना पत्र पाठवून राजर्षी शाहूंनी डॉ. वॉन्लेस यांना देणगी दिलेल्या जमीनीची नोंदणी करुन देण्यास सांगितले आहे. या पत्रात राजर्षी शाहूंनी मिशन इस्पितळाच्या समोर असलेली साडेसहा एकर जमीन मिशन हॉस्पिटलच्या विस्तारासाठी आणि अधिक चांगली वैद्यकीय सेवा मिळण्यासाठी डॉ. वॉन्लेस यांना देणगी दिल्याचा उल्लेख आहे.
राजर्षी शाहूंनी दिलेल्या या जमीनीची मिरज संस्थानात नोंदणी करण्यासंदर्भात काही तांत्रिक अडचणी होत्या. त्या दूर झाल्यानंतर 26 फेब्रुवारी 1913 रोजी डॉ. वॉन्लेस यांना सदरची जमीन नोंदणी करण्यास परवानगी दिल्याचे दिसते. कोल्हापूर दरबार आणि मिरज संस्थान यांच्यात झालेल्या या पत्रव्यवहारावरुन राजर्षी शाहूंनी डॉ. वॉन्लेस यांना जमीनीच्या स्वरुपात केलेल्या अमूल्य मदतीची माहिती मिळते.