सचिन पायलट गटाच्या एका आमदाराचा राजीनामा
जयपूर / वृत्तसंस्था
साधारणतः सहा महिन्यांपूर्वी राजस्थान काँग्रेसमध्ये युवा नेते सचीन पायलट यांनी केलेल्या बंडाच्या आठवणी ताज्या असतानाच आता पुन्हा तेथील सत्ताधारी पक्षात नाराजीने डोके वर काढले आहे. पायलट गटाचे ज्येष्ठ आमदार आणि माजी मंत्री हेमाराम चौधरी यांनी आमदारपदाचा राजीनामा सादर केल्याने चर्चांना उधाण आले असून मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या समस्या वाढल्या आहेत.
आपली पक्षात बराच काळपासून कोंडी केली जात होती. पक्षातीलच काही नेते आपल्या विरोधात आहेत. त्यांनी कारस्थान करून आपला प्रभाव कमी करण्याचा प्रयत्न चालविला आहे. अशा परिस्थितीत आपण काँगेसचे आमदार म्हणून कार्य करू शकत नाही. आपला राजीनामा स्वीकारला जावा, असे हेमाराम चौधरी यांनी त्यांच्या राजीनामा पत्रात स्पष्ट केले. हा राजीनामा त्यांनी विधानसभा अध्यक्षांना मंगळवारी पाठविला. त्यामुळे पुन्हा खळबळ उडाली आहे.
गेल्यावर्षी सचीन पायलट यांनी पुकारलेल्या बंडात चौधरी हे पायलट यांच्या बाजूने होते. त्यामुळे त्यांना मंत्रिपद गमवावे लागले. नंतर हे बंड शमले. पायलट यांनी आपल्या आमदारांना पुन्हा काँग्रेसकडे वळविले. परिणामी अशोक गेहलोत यांचे मुख्यमंत्रिपद सुरक्षित राहिले. त्यानंतर बराच काळ शांतता होती.
पायलट पडद्याआड
तथापि, आता राजस्थान सरकार कोरोनाशी झुंजत असताना पुन्हा काही बंडखोर आमदारांनी मुख्यमंत्री गेहलोत यांच्या विरोधात आघाडी उघडल्याचे दिसून येते. या आघाडीला सचीन पायलट यांचा पाठिंबा आहे की नाही याविषयी अधिकृतरित्या काहीही स्पष्ट करण्यात आलेले नाही. तथापि, त्यांच्या गुप्त सहकार्याशिवाय बंड शक्य नाही, असेही बोलले जात आहे. गेहलोत यांचा पवित्रा सावध आहे. चौधरी यांनी 14 फेब्रुवारीलाही राजीनामा दिला होता. तथापि तो फेटाळण्यात आला होता. आता पुन्हा त्यांनी नाराजी व्यक्त करत राजीनामा दिला.