राजापूर/ प्रतिनिधी
रत्नागिरी लघु उद्योजक संघटनेचे अध्यक्ष, राजापूर तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष, राजापूरचे माजी नगराध्यक्ष तसेच आझाद फुड्स या उद्योगाचे मालक जावेद अब्दुल गफूर ठाकूर (60) यांचे शुक्रवारी सायंकाळी रत्नागिरी येथे खासगी रूग्णालयात निधन झाले. त्यांच्या आकस्मिक निधनाने जिल्हयासह राजापूर शहरावर शोककळा पसरली.
गुरूवारी सकाळी ठाकूर यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यांना रक्ताच्या उलटय़ा होऊ लागल्याने राजापूरातील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर अधिक उपचारासाठी रत्नागिरीतील परकार रूग्णालयात हलविण्यात आले होते. मात्र उपचाराला प्रतिसाद न मिळाल्याने शुक्रवारी सायंकाळी 6 वाजता त्यांची प्राणज्योत मालावली.
राजापूरातील प्रसिध्द ठाकूर उद्योग समूहाचे प्रमुख असलेले जावेद ठाकूर यांचा पिंड समाजकार्याचा. जिल्हयाच्या सामाजिक, शैक्षणिक, औद्योगिक आणि राजकिय चळवळीतील अग्रेसर व्यक्तीमत्व अशी त्यांची ओळख होती. 1985 मध्ये त्यांनी राजापूरमध्ये नगरसेवक म्हणून राजकारणात पदार्पण केले. 1994 मध्ये त्यांनी राजापूरचे नगराध्यक्षपदही भूषवले होते. नगराध्यक्षपदाच्या अल्प काळात शहर विकासाला नवा आयाम देण्याचा प्रयत्न त्यांनी केला.
रत्नागिरी लघु उद्योजक संघटनेसाठीही त्यांचे काम लक्षणीय स्वरूपाचे राहिले आहे. राजापूरच्या शैक्षणिक चळवळीत त्यांचा मोलाचा वाटा आहे. राजापूर तालुका एज्युकेशन सोसायटीचे गेली सहा वर्षे अध्यक्ष म्हणून काम केले. त्यांनी नवजीवन हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या माध्यमातून राजापूर शहर आणि तालुका परिसरातील सर्वसामान्य कुटुंबातील गोरगरिब विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबवून त्यांनी राजापूरतच नव्हे तर रत्नागिरी जिल्हयात एक दर्जेदार आणि आदर्श संस्था असा संस्थेचा नावलौकिक वाढविला. राजापूरातील बज्मे उर्दु आदब संचलित नॅशनल इंग्लीश स्कुल या संस्थेवरही काही काळ संचालक म्हणून त्यांनी काम पाहिले.
राज्याचे माजी मुख्यमंत्री कै. विलासराव देशमुख यांच्याशी त्यांचे कौटुंबीक संबध होते. त्यांच्या राजकिय आणि सामाजिक कार्यामुळे अनेक राजकिय नेत्यांनी त्यांच्या ठाकूर उद्योग समूहाला भेट देऊन त्यांच्या कामाचे आणि कार्याचे कौतुक केले आहे. राजापूर शहर आणि तालुका परिसरात हिंदू मुस्लीम समाजात ते लोकप्रिय होते.
त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच राजापूर शहर व तालुका परिसरातील अनेकांनी त्यांच्या शहर बाजारपेठेतील निवासस्थानी धाव घेत ठाकूर कुटुंबीयांचे सांत्वन केले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, आई, बहिण असा परिवार आहे. शनिवारी सकाळी 11 वाजता शहरातील तालीमखाना दफनभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
लघु उद्योजक संघटना पोरकी
आमच्या संघटनेचा आधारवड म्हणून काम करणारे जावेदभाई गेले याचे अपार दुःख आहे. प्रत्येकाला सोबत घेऊन पुढे जाणारा आणि ऋजू स्वभावाचा नेता हरपला. एकाच वर्षात जावेदभाई आणि उपाध्यक्ष जॉन अब्राहम हे दोन नेते आम्ही गमावले. रत्नागिरीत 25 वर्षांहून अधिक काळ बेकरी उत्पादने तयार करणारा कारखाना कुशल रितीने चालवला.