16 नव्या रुग्णांची भर : दोघांचा मृत्यू, हावेरी आढळला पहिला रुग्ण
प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत असून त्यात सोमवारी 16 नव्या रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्णांची संख्या 651 वर पोहोचली आहे. धक्कादायक बाब म्हणजे गुलबर्गा, दावणगेरेप्रमाणेच बिदरमध्ये कोरोनाग्रस्तांची मोठी भर पडली आहे. सोमवारी येथे एकाच रुग्णामुळे 7 जणांना संसर्ग झाला आहे. तर दावणगेरे आणि गुलबर्गा जिल्हय़ातील दोघांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांची आकडेवारीही 27 वर पोहोचली आहे.
बिदर जिल्हय़ात एकाच दिवशी 7 जण कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यांना रुग्ण क्रमांक 590 च्या संपर्कात आल्याने कोरानाचा संसर्ग झाला आहे. त्याचप्रमाणे मंडय़ा आणि गुलबर्ग्यात प्रत्येकी 2, चिक्कबळ्ळापूर, हावेरी, विजापूर आणि बेंगळूर शहर जिल्हय़ात प्रत्येकी 1 रुग्ण पॉझिटिव्ह आढळला आहे. हावेरी जिल्हय़ात सोमवारी पहिला रुग्ण आढळला आहे. सवनूर येथील 32 वर्षीय युवकाला कोरोनाची लागण झाली आहे. तो काही दिवसांपुर्वीच मुंबईहून परतला होता.
राज्यात निम्मे रुग्ण संसर्गमुक्त
राज्यात एकीकडे कोरोनाची लागण होणाऱयांची संख्या झपाटय़ाने वाढत असताना दुसरीकडे संसर्गमुक्त होणाऱयांची संख्याही वाढत आहे. आरोग्य खात्याच्या दृष्टीने ही बाब समाधानकारक आहे. सोमवारी एकाच दिवशी 22 जण कोरोनाच्या संसर्गापासून मुक्त झाले आहेत. बेळगाव जिल्हय़ातील विजापूरमधील 4, गुलबर्ग्यातील 3 आणि धारवाड जिल्हय़ातील (हुबळी) दोघांना इस्पितळातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात आतापर्यंत 321 जण संसर्गमुक्त झाले आहेत.
गुलबर्ग्यातील मृतांची संख्या 6 वर
राज्यात आतापर्यंत 27 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामध्ये बेंगळूर आणि गुलबर्ग्यातील प्रत्येकी 6 जणांचा समावेश आहे. सोमवारी 56 वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे बळी गेला. तो 29 एप्रिल रोजी कोरोनाग्रस्त आढळला होता. त्याला खोकला आणि न्युमोनियाचीही बाधा झाली होती. त्याचप्रमाणे दावणगेरे येथे 48 वर्षीय महिला देखील दगावली आहे. ती 1 मे रोजी कोरोनाबाधित आढळली. मधूमेह, तीव्र रक्तदाब, अस्थमा आणि थॉयरॉईडने त्रस्त होती.