प्रतिनिधी/ रत्नागिरी
57 वी पुरुष-महिला राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा सोलापूर जिल्हय़ातील वेळापूर (ता. माळशिरस) येथील पालखी मैदानावर आज शनिवार 11 ते सोमवार 13 डिसेंबर या कालावधीत रंगणार आहे. या स्पर्धेसाठी रत्नागिरी जिह्याचा पुरुष आणि महिला संघ रवाना झाला.
खो-खोचे आधारस्तंभ व महाराष्ट्र खो-खो संघटनेचे माजी अध्यक्ष शरदचंद्र पवार यांचा वाढदिवस 12 डिसेंबर हा दिवस महाराष्ट्रात खो-खो दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्यानिमित्त या राज्य स्पर्धेचे आयोजन वेळापूर येथील अर्धनारी नटेश्वर क्रीडा मंडळ यांच्यावतीने आणि महाराष्ट्र खो-खो असोसिएशन व सोलापूर जिल्हा खो -खो असोसिएशन यांच्या मान्यतेने केले आहे. कोरोना महामारीमुळे या स्पर्धा कोरोनाच्या शासकीय सर्व नियमांचे पालन करून घेण्यात येत आहेत. पुरुष व महिला गटाच्या विभागीय साखळी स्पर्धेतून विजयी व उपविजयी झालेले प्रत्येकी सोळा-सोळा संघ या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. त्यामुळे ही स्पर्धा बाद पध्दतीने होईल. तीन दिवस होणाऱया या स्पर्धेसाठी पालखी मैदानावर खो-खोची तीन क्रीडांगणे करण्यात आली असून या स्पर्धा सकाळ आणि सायंकाळ-रात्री विद्युतझोतात होतील. येथे प्रेक्षकांसाठी भव्य गॅलरीची व्यवस्था करण्यात आली आहे. बाद फेरीच्या सामन्यात पुरुषांमध्ये रत्नागिरीचा सामना ठाणे तर महिलांमध्ये रायगड संघाबरोबर होणार आहे.
रत्नागिरीचा खो–खो महिला संघः अपेक्षा सुतार, आरती कंबळे, श्रद्धा लाड, गौरी पवार, माधवी बोरसुतकर, श्रेया सनगरे, साक्षी डाफळे, पायल पवार, पल्लवी सनगले, कोमल सनगले, दिव्या पाल्ये, अक्षता गावडे तर प्रशिक्षक पंकज चवंडे हे आहेत.
खो–खो पुरूष संघः साहिल सनगले, निखील सनगले, श्रवण धावडे, दर्शन सनगले, चेतन सनगले, दीपक धावडे, सुमित गेलये, हर्ष माने, रोहित रांभाडे, अक्षय गुरव, आकाश गव्हाणे, सौरभ शिंदे.