गाझीपूर / वृत्तसंस्था
दिल्लीनजीकच्या गाझीपूर सीमेवर शेतकऱयांनी होम हवन करुन दिवंगत सीडीएस जनरल बिपिन रावत यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. हे शेतकरी आंदोलनात सहभागी झालेले होते. आता आंदोलन मागे घेण्यात आले आहे. त्यामुळे आता ते घरी जाण्याची तयारी करीत आहेत. मात्र, त्यापूर्वीच जनरल रावत यांच्या हेलिकॉप्टर अपघातात निधनाचे वृत्त आल्याने आपल्याला प्रचंड धक्का बसला असे या शेतकऱयांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. रावत हे महान योद्धा होते. त्यांचा असा मृत्यू होणे देशासाठी धक्कादायक आहे. त्यांना श्रद्धांजली देणे आमचे कर्तव्य आहे, अशी भावना या शेतकऱयांनी व्यक्त केली. जनरल रावत यांचे बुधवारी तामिळनाडूत हेलिकॉप्टर अपघातात निधन झाले होते.