आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करा-मिरखेलकर
प्रतिनिधी / मिरज
मिरज तालुक्यातील 22 ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता आदेश लागू आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील हॉटेल, बार, रेस्टॉरंट, वॉईनशॉप आणि लिकर शॉप दहानंतर सुरू ठेवल्यास कारवाई केली जाईल, असा इशारा मिरज पोलिस ठाण्याचे परिविक्षाधिन पोलिस अधिक्षक आदित्य मिरखेलकर यांनी दिला आहे. आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
31 डिसेंबर रोजी थर्टी फस्ट साजरा करण्यासाठी अनेक हॉटेल, बार, रेस्टॉरंट, वॉईनशॉप आणि लिकर शॉपमध्ये गर्दी होऊ शकते. मात्र, आचारसंहिता लागू असल्याचे भान सर्वांनी ठेवावे. ग्रामीण भागातील दारु दुकाने आणि हॉटेल चालकांनी रात्री दहानंतर व्यवसाय सुरू ठेवल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल. वेळ पडल्यास परवानाही निलंबित करण्यात येईल, असा इशाराही मिरखेलकर यांनी दिला. आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करुन पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही पोलिस प्रशासनाने केले आहे.