भेंडीगेरी येथील घटनेत फिर्यादीच निघाला आरोपी, चौघा जणांना अटक
प्रतिनिधी/ बेळगाव
आठ दिवसांपूर्वी भेंडीगेरी (ता. बेळगाव) येथे संगोळ्ळी रायण्णा पुतळय़ाची विटंबना करण्यात आली होती. या प्रकरणाचा छडा लावण्यात हिरेबागेवाडी पोलिसांना यश आले आहे. पुतळय़ाची विटंबना झाल्याची ज्यांनी फिर्याद दिली होती, त्याच तरुणाला अटक झाली असून मराठा तरुणांना अडकविण्यासाठी पुतळय़ाची विटंबना केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे.
गेल्या शनिवारी 21 मे रोजी क्रांतिवीर संगोळ्ळी रायण्णा पुतळय़ाची विटंबना करण्यात आली होती. दिवंगत अभिनेते पुनीत राजकुमार यांची प्रतिमा लावलेला खांबही मोडण्यात आला होता. या घटनेनंतर गावकऱयांनी आरोपींना अटक करा, या मागणीसाठी धरणे धरले होते. गावातील मराठा समाजातील तरुणांना अडचणीत आणण्यासाठी हा सारा खटाटोप करण्यात आला होता.
हिरेबागेवाडीचे पोलीस निरीक्षक विजयकुमार सिन्नूर व त्यांच्या सहकाऱयांनी या संपूर्ण प्रकरणाचा छडा लावला आहे. चंद्राप्पा लक्ष्मण कणबर्गी (रा. भेंडीगेरी), महांतेश करिगार (रा. शिंदोळी), बसवराज उर्फ देमाप्पा हुलमनी, अर्जुन भोजप्पा शिवनायकर (दोघेही रा. नेगिनाळ, ता. बैलहोंगल) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.
पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या यांनी यासंबंधी एक पत्रक प्रसिद्धीस दिले आहे. पुतळा विटंबना प्रकरणी चंद्राप्पा कणबर्गी याने फिर्याद दिली होती. भेंडीगेरी येथील मराठा समाजाच्या तरुणांनी पुतळा विटंबना केली आहे त्यांना अटक करा, अशी मागणी करण्यात येत होती. पोलिसांनी प्रकरणाच्या मुळापर्यंत जाऊन चौघा जणांना अटक केली आहे.
मराठी तरुणांना अडचणीत आणण्यासाठी कट
चंद्राप्पा कणबर्गी या युवकाच्या नात्यातील एका अल्पवयीन मुलीचा विवाह ठरला होता. 21 मे रोजी होन्नीहाळ येथील मारुती नामक तरुणाबरोबर हे लग्न होणार होते. यासंबंधीची माहिती महिला व बाल कल्याण खात्याच्या अधिकाऱयांना मिळताच पोलिसांच्या सहकार्याने हे लग्न थांबविण्यात आले होते. त्यामुळे गावातील मराठा समाजातील तरुणांनी या लग्नाविषयी पोलिसांना माहिती दिली असणार, या समजुतीने त्यांना अडचणीत आणण्यासाठी कट रचण्यात आला.
या कटाचा एक भाग म्हणून क्रांतिवीर संगोळ्ळी रायण्णा पुतळय़ाची विटंबना करण्यात आली. त्याचे खापर मराठा समाजातील तरुणांवर फोडण्यात आले. कन्नड संघटनांशी संपर्क साधून पुतळा विटंबना झाली तरी पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले नाही तर मोठय़ा प्रमाणात आंदोलन छेडूया, असे सांगत यासाठी तयारी करण्यात आली होती. पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा छडा लावून चौघा जणांना अटक केली आहे.
कटाचा मास्टरमाईंड नेगिनाळचा!
कित्तूर संस्थानमधील क्रांतिवीर संगोळ्ळी रायण्णा यांना पकडून देण्यासाठी नेगिनाळ येथील काही जणांनी ब्रिटिशांना माहिती दिली होती. हा इतिहास आहे. आता पुतळा विटंबनेचा कट रचणारा बसवराज हुलमनी हा तरुणही नेगिनाळचाच आहे. या प्रकरणाचा चाणाक्षपणे छडा लावणारे पोलीस निरीक्षक विजयकुमार सिन्नूर यांचे अभिनंदन होत आहे.