18 सदस्यीय मजबूत संघाची घोषणा, ड्रगफ्लिकर हरमनप्रीतकडे उपकर्णधारपदाची धुरा
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
बर्मिंगहममध्ये होणाऱया आगामी राष्ट्रकुल स्पर्धेसाठी भारताने 18 सदस्यीय मजबूत संघ निवडला असून पुन्हा एकदा मनप्रीतकडे नेतृत्वाची धुरा सोपवली आहे. ड्रगफ्लिकर हरमनप्रीत सिंग उपकर्णधार असेल. यंदाची राष्ट्रकुल स्पर्धा दि. 28 जुलै ते 8 ऑगस्ट या कालावधीत बर्मिंगहममध्ये खेळवली जाणार आहे.
बर्मिंगहममधील राष्ट्रकुल स्पर्धा व 2024 पॅरिस ऑलिम्पिकसाठी क्वॉलिफायर असणारी हांगझू आशियाई स्पर्धा यात खूपच कमी कालावधी असल्याने राष्ट्रकुलसाठी दुसऱया फळीतील खेळाडूंचा संघ पाठवण्याचा हॉकी इंडियाचा विचार होता. मात्र, यादरम्यान चीनमधील आशियाई स्पर्धा कोव्हिड-19 परिस्थितीमुळे लांबणीवर टाकण्यात आली आणि या पार्श्वभूमीवर हॉकी इंडियाने यापूर्वीचा प्रस्ताव मागे घेत राष्ट्रकुलसाठी अव्वल दर्जाचा संघ पाठवण्याचा निर्णय घेतला.
भारतीय संघाचा या प्रतिष्ठेच्या स्पर्धेसाठी इंग्लंड, कॅनडा, वेल्स व घानासह ब गटात समावेश आहे. दोनवेळा रौप्य जिंकणारा भारतीय संघ दि. 31 जुलै रोजी घानाविरुद्ध लढतीने आपल्या मोहिमेला सुरुवात करेल.
यापूर्वी टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताने ऐतिहासिक कांस्य जिंकले, त्यावेळी मनप्रीतकडे संघाच्या नेतृत्वाची धुरा होती. अलीकडेच बेल्जियम, नेदरलँड्समधील एफआयएच प्रो लीगमध्ये रोहिदास कर्णधार होता. आता मनप्रीत त्याच्याकडून नेतृत्वाची सूत्रे स्वीकारेल. या संघाचे उपकर्णधारपद सोपवल्या गेलेल्या हरमनप्रीतने हॉकी प्रो लीगमध्ये सर्वाधिक गोल नोंदवले आहेत.
अनुभवी गोलरक्षक पीआर श्रीजेश व क्रिशन बी. पाठक दुखापतीतून सावरल्यानंतर पुन्हा संघात परतले असून डिफेंडर्समध्ये वरुण कुमार, सुरेंदर कुमार, हरमनप्रीत सिंग, अमित रोहिदास, जुगराज सिंग, जरमनप्रीत सिंग यांचा समावेश आहे. मनप्रीत, हार्दिक सिंग, विवेक सागर प्रसाद, शमशेर सिंग, आकाशदीप सिंग व नीलकांता शर्मा यांच्यावर मध्यफळीची भिस्त असेल.
भारतीय संघ
गोलरक्षक ः पीआर श्रीजेश, क्रिशन बहादूर पाठक
डिफेंडर ः वरुण कुमार, सुरेंदर कुमार, हरमनप्रीत सिंग (उपकर्णधार), अमित रोहिदास, जुगराज सिंग, जरमनप्रीत सिंग.
मिडफिल्डर्स ः मनप्रीत सिंग (कर्णधार), हार्दिक सिंग, विवेक सागर प्रसाद, शमशेर सिंग, आकाशदीप सिंग, निलकांता शर्मा.
फॉरवर्ड ः मनदीप सिंग, गुर्जंत सिंग, ललित कुमार उपाध्याय, अभिषेक.