बेळगाव / प्रतिनिधी
चन्नम्मानगर येथील रहिवासी व राष्ट्रीय ऍथेलेटिक्सपटू सुरेश लक्ष्मणराव देवरमनी यांच्या 70 व्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी कॉंगेस पक्षातर्फे शुक्रवारी मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात पार पडली. या स्पर्धेला उचगाव येथील मळेकरणी मंदिरापासून सुरूवात झाली. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजू पाटील यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून या स्पर्धेला प्रारंभ करण्यात आला.
यावेळी राष्ट्रीय ऍथेलेटिक्सपटू सुरेश देवरमनी व वयोवृध्द धोंडीबा शिंदे यांनी देखील या स्पर्धेत उत्स्फुर्तपणे सहभाग घेतला. बेळगाव आंबेडकर गार्डनमध्ये या स्पर्धेची सांगता झाली. यावेळी कोरोना मुक्तीचा संदेश देण्याबरोबर जागृती करण्यात आली. यावेळी राष्ट्रीय कॉंग्रेस पार्टीचे अध्यक्ष राजू पाटील, राज्य सचिव के. जी. पाटील, उपाध्यक्ष जोतिबा पाटील, सरचिटणीस अमोल देसाई, सदस्य दुर्गेश मेत्री, रामकृष्ण सांबरेकर, नारायण मेत्री, कृष्णा कांबळे, विनायक पाटील, यासह स्पर्धक उपस्थित होते.