उच्च न्यायालय, लवादांमध्ये रिक्त पदे
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
अनेक उच्च न्यायालयांमध्ये न्यायाधीश आणि लवादांच्या प्रमुखांची पदे रिक्त असण्यावरून काँग्रेसचे वरिष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी शनिवारी केंद्र सरकारला लक्ष्य केले आहे. स्वतःच्या विचारसरणीसोबत जवळीक बाळगणाऱया लोकांचा शोध सुरू असल्यानेच सरकार या जागा भरू शकत नसल्याचा आरोप चिदंबरम यांनी केला आहे.
उच्च न्यायालयांच्या न्यायाधीशांच्या निर्धारित 1,080 पदांपैकी 416 रिक्त आहेत. लवादांमध्येही मोठय़ा संख्येत रिक्त पदे आहेत. अनेक लवादांचे प्रमुखपदच रिक्त आहे. मोदी सरकार 7 वर्षांपासून सत्तेवर असूनही ही रिक्त पदे का भरली जात नाहीत किंवा या रिक्त पदांवर भरती करण्याचा उद्देश का नाही असा प्रश्न चिदंबरम यांनी उपस्थित केला आहे.
स्वतःची प्रतिगामी मानसिकता आणि विचारसरणीशी जवळीक बाळगणाऱया व्यक्तींच्या शोधात सरकार आहे, हे याचे खरे कारण असल्याचा दावा माजी केंद्रीय गृहमंत्र्यांनी ट्विट करत केला आहे. विविध लवादांमधील रिक्त पदे न भरणे ‘अत्यंत खेदजनक स्थिती’ असल्याचे म्हणत सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला 10 दिवसांच्या आता उचलण्यात आलेल्या पावलांची माहिती देण्याचा निर्देश दिला होता. यासंबंधी ‘एखादी लॉबी’ काम करत असल्याचा संशय सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केला होता.