हुनरबाज देश की शान शो
बॉलिवूड कलाकारांनी छोटय़ा पडद्यावर स्वतःचे नशीब आजमाविण्याचा ट्रेंड मागील काही वर्षांपासून सुरू आहे. अमिताभ बच्चन, सलमान खान, शाहरुख खान, शिल्पा शेट्टी, माधुरी दीक्षित, रोहित शेट्टी, करण जौहर समवेत अनेक कलाकारांनी टेलिव्हिजन होस्ट म्हणून काम केले, तर काही जणांनी परीक्षक म्हणून काम पाहिले आहे. आता या यादीत अभिनेत्री परिणीति चोप्राचे नाव जोडले जाणर आहे.
काही दिवसांपूर्वी ‘हुनरबाज-देश की शान’ या रियलिटी शोच्या निर्मात्यांनी परिणीतिला परीक्षक म्हणून सामील होण्याचा प्रस्ताव दिला होता. चित्रपटाच्या चित्रिकरणाचे वेळापत्रक विचारात घेतच या शोचे शूटिंग करण्यात येणार असल्याचे आश्वासन निर्मात्यांनी तिला दिले आहे. परिणीतिने हा प्रस्ताव स्वीकारला आहे. या शोमध्ये परिणीतिसोबत करण जौहर आणि मिथुन चक्रवर्ती परीक्षक म्हणून दिसून येणार आहेत. अभिनेत्रीचा टेलिव्हिजनवरील हा पहिला शो नाही. यापूर्वी 2014 मध्ये ‘सिनेस्टार्स की खोज’मध्ये ती मार्गदर्शक म्हणून दिसून आली होती. परिणीतिने आतापर्यंत 15 चित्रपटांमध्ये काम केले आहे. यातील अनेक चित्रपट यशस्वी ठरलेले नाहीत. चालू वर्षात तिचे दोन चित्रपट ‘द गर्ल ऑन द ट्रेन’ आणि ‘सायना’ हे ओटीटीवर झळकले होते. तर अर्जुन कपूरसोबत तिचा चित्रपट ‘संदीप और पिंकी फरार’ चमकू शकला नव्हता.