चंदिगढ / वृत्तसंस्था
पंजाबच्या फिरोजपूर जिल्हय़ात शनिवारी एका शेतात टिफिनमध्ये हातबॉम्ब सापडल्याने खळबळ उडाली. सेखवन गावातील शेतात बॉम्ब सापडल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. बॉम्ब सापडल्याची माहिती मिळाल्यानंतर झिराचे डीएसपी आणि इतर पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. तसेच जालंधर येथून बॉम्बनिकामी करणाऱया पथकाला पाचारण करण्यात आले होते. यासंबंधी पोलीस अधिक तपास करत आहेत. तसेच बीएसएफचे जवान नाकाबंदी करून संशयितांचा शोध घेत आहेत.
बॉम्बची माहिती मिळाल्यानंतर कोणत्याही पोलीस अधिकाऱयाने कोणतेही स्पष्ट वक्तव्य केलेले नाही. याबाबत आत्ताच काही सांगता येणार नाही. आम्ही तपास करत असून लवकरच याबाबत माहिती दिली जाईल, असे एसएसपी फिरोजपूर हरमनदीप सिंग हंस यांनी स्पष्ट केले. पंजाबमधील काही जिल्हय़ांमध्ये अशाप्रकारे शेतात सतत बॉम्ब सापडत आहेत.
केंद्र सरकारने सीमा सुरक्षा दलाला (बीएसएफ) सीमारेषेपासून 50 किमी परिसरात तपास करण्याचे अधिकार दिले आहेत. शनिवारी प्रथमच फिरोजपूर शहरात बीएसएफकडून वाहनांची तपासणी करण्यात आली. फिरोजपूरमध्ये विविध ठिकाणी बीएसएफकडून नाकाबंदी करण्यात आली असून मोठय़ा प्रमाणात वाहनांची तपासणी करण्यात येत आहे.