दिल्ली उच्च न्यायालयाच्या स्थगितीला दिले आव्हान
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
फ्युचर रीटेल आणि रिलायन्स रीटेल यांच्यातील कराराच्या संदर्भात अमेझॉनने सर्वोच्च न्यायालयात स्पेशल लीव्ह याचिका सादर केली आहे. या दोन कंपन्यांमधील कराराला दिल्ली उच्च न्यायालयाने स्थगिती दिली होती. या स्थगितीविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यात आली आहे. हा करार 24,713 कोटींचा आहे. या व्यवहारासंदर्भातला पहिला निर्णय एक सदस्यीय पीठाने दिला होता. त्या निर्णयाला दिल्ली उच्च न्यायालयाच्या दोन सदस्यीय खंडपीठाने स्थगिती दिली होती. सर्वोच्च न्यायालयाने याचिका सादर करून घेतली.
आपल्या वकीलांकडून या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडली जाईल, असे फ्युचर रीटेलच्या प्रवक्त्याने पत्रकारांना स्पष्ट केले. एक सदस्यीय पीठाच्या या संदर्भातील निर्णयाला दिल्ली उच्च न्यायालयाने 22 मार्चला स्थगिती दिली होती. तसेच कनिष्ठ न्यायालयाने केलेल्या दंडालाही उच्च न्यायालयाने स्थगिती दिली होती. या दोन कंपन्यांमध्ये गेली सहा वर्षे न्यायालयीन वाद सुरू आहे.
फ्युचर आणि रिलायन्स यांच्यात झालेल्या करारावर सिंगापूरमधील लवादाने 25 ऑक्टोबर 2020 निवाडा दिला होता. फ्युचर रीटेलला या कराराप्रमाणे कारवाई करण्याचा अधिकार आहे, असे या निवाडय़ात स्पष्ट करण्यात आले होते. त्यामुळे या निवाडय़ाचे क्रियान्वयन करण्यात यावे, अशी मागणी करणारी याचिका फ्युचरच्या वतीने दिल्ली उच्च न्यायालयात करण्यात आली होती.
अमेझॉनचा संबंध कसा?
अमेझॉन ही अमेरिकेतील कंपनी असून ती किरकोळ ऑन लाईन विक्री व्यवसायातील जगातील मोठी कंपनी मानली जाते. या कंपनीचा फ्युचर रीटेल कंपनीबरोबर न्यायालयात वाद सुरू आहे. त्यामुळे फ्युचर रिटेलने रिलायन्सशी करार केल्यानंतर त्या कराराला अमेझॉनने आक्षेप घेतला होता. त्यामुळे फ्युचर रिटेल आणि अमेझॉन यांच्यातही न्यायालयीन वाद सुरू आहे. म्हणून फ्युचर रिटेल आणि रिलायन्स रीटेल यांच्यातील कराराला स्थगिती मिळाल्यानंतर रिलायन्सने या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे.
ऑक्टोबर 2020 मध्ये अमेझॉनने फ्युचर रीटेल कंपनीविरोधात सिंगापूर येथील आपत्कालीन लवादासमोर प्रकरण सादर केले होते. फ्युचरने आपला विश्वासघात करून रिलायन्स रीटेलशी करार केला आहे, असे अमेझॉनचे म्हणणे होते. अमेझॉनने फ्युचर रीटेलमध्ये 2019 मध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. त्यामुळे आपल्या अनुमतीशिवाय फ्युचरने कोणत्याही अन्य कंपनीशी परस्पर करार करू नये, असे अमेझॉनचे म्हणणे आहे. त्यामुळे आता सर्वोच्च न्यायालयात अमेझॉन, फ्युचर रीटेल आणि रिलायन्स रीटेल असा तिहेरी वाद रंगणार असून त्याकडे उद्योग जगताचे बारकाईने लक्ष राहील, असे अनेक तज्ञांचे म्हणणे आहे.