वृत्तसंस्था/ प्राग
डब्ल्यूटीए टूरवरील येथे सुरू असलेल्या प्राग खुल्या महिलांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत रुमानियाची माजी टॉप सीडेड आणि माजी विम्बल्डन विजेती सिमोना हॅलेपने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविताना झेकच्या पेजीसीकोव्हाचा पराभव केला.
सध्या महिला टेनिसपटूंच्या मानांकनात दुसऱया स्थानावरील हॅलेपने गुरुवारच्या सामन्यात झेकच्या बार्बोरा पेजीसीकोव्हावर 3-6, 7-5, 6-2 अशी मात करत शेवटच्या आठ खेळाडूंत स्थान मिळविले. हॅलेपला विजयासाठी तब्बल दोन तास झगडावे लागले. ही स्पर्धा प्रेक्षकांविना बंदिस्त टेनिस कोर्टवर खेळविली जात आहे. हॅलेपचा उपांत्यपूर्व फेरीचा सामना पोलंडच्या प्रेचशी होणार आहे.