प्रतिनिधी / बेंगळूर
राज्यात रेमडेसिवीर इंजेक्शनची कमतरता भासत आहे. याच दरम्यान त्याची काळाबाजारात विक्री होत असून या प्रकरणी कारवाई करावी, अशी सूचना मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी अधिकाऱयांना दिली आहे. मंगळवारी त्यांनी आपले शासकीय निवासस्थान ‘कावेरी’ येथे अधिकाऱयांची बैठक घेतली.
राज्यात रेमडेसिवीरचा काळाबाजार होत असून यावर बारकाईने लक्ष ठेवावे. राज्यात कोरोनाचा व्यापक प्रादुर्भाव झाला आहे. अशा कठीण प्रसंगी केंद्र सरकार आपल्या सोबत आहे. मात्र काही अधिकारी रेमडेसिवीरचे डोस इतर राज्यांना पाठवित असल्याची माहिती आपल्याला मिळाली आहे. याबाबत चौकशी करेन. जर यामध्ये कोणी दोषी आढळल्यास त्याची गय केली जाणार नाही. आपण हे प्रकरण चौकशीसाठी सोपविल्यास सत्य उजेडात येईल. अशा प्रकरणामध्ये कोणताही अधिकारी आढळला तर त्याचे गंभीर परिणाम होतील, असा इशारा त्यांनी याप्रसंगी दिला.
जनतेच्या सेवेसाठी कटिबद्ध रहा
प्रत्येक अधिकाऱयाने जनतेच्या सेवेसाठी कटिबद्ध असावे. रेमडेसिवीर अन्य राज्यांना न पाठविता राज्यात जेथे कमतरता आहे तेथे पाठविण्याची व्यवस्था करावी. त्याचा काळाबाजार होणार नाही. याकडेही जातीने लक्ष द्यावे. जर कोणी या कामात गुंतले असतील, तर त्यांच्यावर कारवाई करा, असे येडियुराप्पा यांनी यावेळी सांगितले.