प्रतिनिधी/ खेड
कोकण मार्गावरील वावेतर्फे नातूनजीक देखभाल दुरूस्ती गाडीची पुढील दोन चाके अचानक निखळून घडलेल्या अपघाताची खातेनिहाय चौकशी करण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
कोकण रेल्वे मार्गावरील खवटी येथून खेडच्या दिशेने येणारी देखभाल दुरूस्ती (युटीव्ही) गाडीची दोन चाके अचानक निखळली. या अपघातामुळे कोकण मार्गावरील रेल्वेगाडय़ांचे वेळापत्रक तब्बल 9 तास बिघडले. 6 रेल्वेगाडय़ांना विविध रेल्वे स्थानकांमध्ये थांबा देण्यात आला. वेरणा येथून रिलीफ व्हॅन घटनास्थळी दाखल झाली. नवीन रूळ बसवल्यानंतरच मार्ग वाहतुकीसाठी खुला झाला.
या अपघाताचे नेमके कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही. मात्र या अपघाताची खात्यांतर्गत विभागवार चौकशी करण्यात येणार आहे. या चौकशीचा अहवाल वरिष्ठ पातळीवर पाठवण्यात येणार असून त्यानंतरच संबंधितावर ठपका ठेवण्यात येणार असल्याचे समजते.