घरीच उपचार घेणाऱयांसाठी भाडेतत्त्वावर देणार : रोटरी फाऊंडेशनचा प्रकल्प
प्रतिनिधी / बेळगाव
रोटरी क्लब ऑफ बेळगावतर्फे व येळ्ळूर रोडवरील केएलई शताब्दी चॅरिटेबल हॉस्पिटलच्यावतीने ऑक्सिजन कॉन्सन्टेटर बँक सुरू करण्यात आली आहे. सोमवारी केएलईचे कार्याध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे यांच्या हस्ते बँकेचे उद्घाटन करण्यात आले.
सदर उपक्रमांतर्गत रोटरी क्लब ऑफ बेळगावने केएलई शताब्दी चॅरिटेबल हॉस्पिटलला 25 कॉन्सन्टेटर्स देणगीदाखल दिले आहेत. त्यांची किंमत अंदाजे 25 लाख रुपये होते. केएलई हॉस्पिटल सदर कॉन्सन्टेटर्स जनतेसाठी भाडेतत्त्वावर देणार आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार जे रुग्ण घरांमध्ये उपचार घेत आहेत त्यांच्यासाठी ही सुविधा उपलब्ध असणार आहे. याची अंमलबजावणी केएलई हॉस्पिटलतर्फे केली जाणार आहे.
ज्या कोणाला सदर कॉन्सन्टेटर्सची गरज भासेल, त्यांना काही नियमांची पूर्तता करावी लागणार आहे. दिवसासाठी ठराविक शुल्क घेऊन सदर कॉन्सन्टेटर्स दिली जातील. डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच ते दिले जातील. कॉन्सन्टेटर्सची सुरक्षितता ही पूर्णतः रुग्णांची जबाबदारी असणार आहे. त्यांना अन्य कुणालाही हे कॉन्सन्टेटर्स देता येणार नाहीत. रुग्णाने कॉन्सन्टेटर परत केल्यानंतर ते पूर्णपणे सॅनिटाईज करण्यात येतील. ज्या रुग्णाला सदर कॉन्सन्टेटर लागतील त्यांनी आधार कार्ड अथवा व्होटर कार्ड सादर करणे आवश्यक आहे.
रोटरीचा हा प्रकल्प रोटरी फाऊंडेशनच्या ग्रँटमधून राबवला जात आहे. त्यासाठी चिंगारी
ऍप, बीईंग ह्युमन, द सलमान खान फौंडेशन आणि रोटरीच्या अन्य क्लबचे सदस्य यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आला आहे. त्यासाठी रोटरीचे माजी अध्यक्ष शरद पै यांनी पुढाकार घेतला असून केवळ बेळगावमध्येच नव्हे तर रोटरीच्या 3170 अंतर्गत येणाऱया सर्व क्लबतर्फे पश्चिम महाराष्ट्र आणि गोवा येथेही हा उपक्रम सुरू होत आहेत.
उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी रोटरी क्लबचे अध्यक्ष रो. डॉ. कान्होबा केळुसकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. रो. संजय कुलकर्णी, पराग भंडारे व डॉ. उडचणकर यांनी या सुविधेच्या प्रक्रियेबद्दल माहिती दिली. रोटरीला अन्य संस्थांचे सहकार्य मिळवून देण्यासाठी रो. योगेश कुलकर्णी यांचे सहकार्य लाभले.
प्रांतपाल संग्राम पाटील यांनी या उपक्रमासाठी 5 लाख रुपये मंजूर केले आहेत. उद्घाटनप्रसंगी डॉ. एच. बी. राजशेखर आणि डॉ. धारवाड उपस्थित होते. त्यांनी काळाची गरज ओळखून रोटरीने केलेल्या सहकार्याबद्दल रोटरीला धन्यवाद दिले.
हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी डिस्ट्रिक्ट 3170 चा डिस्ट्रिक्ट ग्रँट, लक्ष्मीकांत नेतलकर यांच्यामार्फत सेंट पॉल्स शाळेची 1987 ची बॅच, प्रताप नलावडे यांच्यामार्फत फेडरेशन ऑफ इंडिया असोसिएशन शिकागो, डॉ. सचिन माऊली, डॉ. आनंद भादवणकर, मनीष शानभाग विजयकांत डेरी, डॉ. संतोष पाटील, प्रमोद भिसे, मुकुंदराव बांदेकर, डॉ. अर्चना जोशी, दिपाली कित्तूर, रो. रुद्र कुमार हालपण्णावर, किरण नाईक, डॉ. व्ही. एन. देसाई, रो. सुनीष मेत्राणी, डॉ. किरण अगाडी, रो. ओम भंडारी आणि रो. बसवराज विभूती यांनी देणगी दिली आहे.