ऑनलाईन टीम / मुंबई :
गेल्या महिन्यात मुंबईमधील घाटकोपरच्या राम निवास इमारतीच्या अंगणात असलेल्या विहिरीमध्ये एक कार पडल्याची घटना घडली होती. त्यावर पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे कारने आत्महत्या केल्याचे मिम्स आणि जोक सोशल मीडियावर फिरत होते. बजाज अलाएन्सने आता त्या कार मालकाला म्हणजे डॉ. किरण दोषींना नवी कोरी कार भेट दिली आहे. त्याची एक जाहीरातही कंपनीकडून करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बुडालेल्या कारचे मालक असलेले मुंबईतील डॉ. किरण दोषी यांनी सांगितले की, कार पाण्यात बुडाल्यानंतर बजाज अलाएन्सचे कर्मचारी माझ्या घरी आले. त्यांनी माझ्याकडून काही फॉर्म भरुन घेतले. त्यानंतर त्यांनी मला कोणत्या कार डिलरकडून कार घेणार हे कळवण्यास सांगितले. त्या कार डिलरला कंपनीच्या वतीने कार पुरवण्यात आली.
मुंबईमधील घाटकोपरच्या राम निवास इमारतीच्या अंगणात असलेल्या विहिरीमध्ये एक कार बुडाली होती. त्यानंतर तब्बल 12 तासानंतर या ठिकाणी चाळीस फूट खोल पडलेली ही कार बाहेर काढण्यास अखेर यश आले होते. या विहिरीमधील लाखो लिटर पाणी उपसल्यानंतर अखेर क्रेनच्या मदतीने ही गाडी बाहेर काढण्यात आली आणि स्थानिकांनी टाळ्यांच्या गजरात आपला आनंद व्यक्त केला होता.