लखनौ / वृत्तसंस्था
लखनौमधील गुडंबा परिसरातील जहिरापूर गावातील झोपडपट्टीला शनिवारी सकाळी भीषण आग लागली. काही वेळातच आगीने भीषण रूप धारण केले. आगीच्या भडक्यामुळे झोपडय़ांमध्ये ठेवलेल्या गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने परिसरात घबराट पसरली. घटनेची माहिती मिळताच दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी सुमारे आठ-दहा गाडय़ांच्या मदतीने दीड तासाच्या प्रयत्नानंतर आग आटोक्मयात आणली. या दुर्घटनेत मोठी वित्तहानी झाली असली तरी सुदैवाने जीवितहानी टळल्याची माहिती सरकारी सूत्रांकडून देण्यात आली.
जहिरापूर गावातील झुग्गी बस्ती येथील झोपडपट्टीतून शनिवारी सकाळी धूर आणि आगीच्या ज्वाळांचे लोट येत असल्याचे पाहून आजूबाजूच्या लोकांनी आरडाओरडा सुरू केला. याचदरम्यान आग नियंत्रणाबाहेर गेली. आगीच्या वेगाने पसरत गेल्यामुळे झोपडपट्टय़ांमधील गॅस सिलिंडर्सचा स्फोट झाला. त्यानंतर लोकांची प्रचंड धावपळ सुरू झाल्याने काही भागात चेंगराचेंगरीही झाली.