केएल राहुल, दीपक हुडाची तडफदार अर्धशतके, अवेश खानचे 24 धावात 4 बळी
नवी मुंबई / वृत्तसंस्था
केएल राहुल (68), दीपक हुडाची (51) तडफदार अर्धशतके व गोलंदाजांच्या सांघिक योगदानाच्या बळावर लखनौ सुपरजायंट्सने आयपीएल साखळी सामन्यात सनरायजर्स हैदराबादचा 12 धावांनी पराभव केला. या लढतीत लखनौने निर्धारित 20 षटकात 7 बाद 169 धावा केल्या तर प्रत्युत्तरात हैदराबादला 9 बाद 157 धावांवर समाधान मानावे लागले.
विजयासाठी 170 धावांचा पाठलाग करताना हैदराबादतर्फे राहुल त्रिपाठी (44) व निकोलस पूरन (34) यांचा अपवाद वगळता अन्य एकही फलंदाज अगदी 30 धावांचा टप्पाही सर करु शकला नाही. लखनौतर्फे अवेश खानने 24 धावात 4, होल्डरने 34 धावात 3 तर कृणाल पंडय़ाने 27 धावात 2 बळी घेतले.
प्रारंभी, कर्णधार केएल राहुल व दीपक हुडा यांनी उपयुक्त अर्धशतके झळकावल्यानंतर लखनौ सुपरजायंट्सने निर्धारित 20 षटकात 7 बाद 169 धावांपर्यंत मजल मारली होती. वास्तविक, या लढतीत लखनौची पॉवर प्ले षटकात 3 बाद 27 अशी दाणादाण उडाली होती. मात्र, नंतर राहुल व दीपक हुडा यांनी चौथ्या गडय़ासाठी 87 धावांची भागीदारी साकारत संघाचा डाव सावरण्यात मोलाचा वाटा उचलला.
राहुलने 6 चौकार व 1 षटकार तर हुडाने 3 चौकार व 3 षटकारांची आतषबाजी केली. आपला पहिला सामना झाल्यानंतर मोठा ब्रेक मिळालेल्या हैदराबादने या लढतीत स्वप्नवत सुरुवात केली होती. मागील लढतीत राजस्थान रॉयल्सविरुद्ध मोठय़ा पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर वॉशिंग्टन सुंदरने येथे जोरदार कमबॅक करताना 28 चेंडूत 2 बळी, असे लक्षवेधी पृथक्करण नोंदवले. त्याने नव्या चेंडूवर गोलंदाजी सुरु करत पहिल्याच षटकात यश मिळवून दिले. त्याने हिरवळीच्या खेळपट्टीवर ऑफ ब्रेक गोलंदाजीवर धोकादायक डी कॉकला बाद केले. कव्हरवरील विल्यम्सनने त्याचा सोपा झेल टिपला.
त्यानंतर काहीच कालावधीत वॉशिंग्टनने इव्हिन लुईसचा (1) अडथळा दूर सारला. इव्हिन लुईस स्लॉग स्वीपचा फटका मारण्याच्या प्रयत्नात पायचीत झाला. मनीष पांडेने रोमारिओ शेफर्डला आल्या पावली एक चौकार व एक षटकार फटकावला. मात्र, अशाच उत्तुंग फटकेबाजीच्या प्रयत्नात त्याने मिडऑनकडे सोपा झेल देत तंबूचा रस्ता धरला. प्रारंभी उत्तम यश लाभल्यानंतर विल्यम्सनने गोलंदाजीत सातत्याने अनेक बदल केले. पण, आक्रमक टी. नटराजनला उशिराने गोलंदाजीला आणण्याचा निर्णय चुकीचा ठरला.
वेगवान गोलंदाज उमरान मलिकने सातत्याने प्रतितास 145 किमी वेगाने गोलंदाजी केली. मात्र, याचवेळी त्याची गोलंदाजी महागडीही ठरली. या स्वैर माऱयामुळे केएल राहुल व दीपक हुडा यांना स्थिरावता आले. या जोडीने चौकार-षटकार फटकावण्याबरोबरच तितक्याच शिताफीने एकेरी-दुहेरी धावा घेण्यावर देखील भर दिला आणि 14 व्या षटकात मलिकने 16 धावा दिल्या, त्यावेळी संघाचे शतक फलकावर लागले होते. शेफर्डने डीपमध्ये त्रिपाठीकरवी हुडाला झेलबाद करत ही डोकेदुखी ठरणारी जोडी फोडली. त्यानंतर बहरातील आयुष बदोनीने 12 चेंडूत 19 धावांची जलद खेळी साकारली.
संक्षिप्त धावफलक
लखनौ सुपरजायंट्स ः 20 षटकात 7 बाद 169 (केएल राहुल 50 चेंडूत 6 चौकार, 1 षटकारासह 68, दीपक हुडा 33 चेंडूत 3 चौकार, 3 षटकारांसह 51. अवांतर 4. वॉशिंग्टन सुंदर, रोमारिओ शेफर्ड, टी. नटराजन प्रत्येकी 2 बळी).
सनरायजर्स हैदराबाद ः 20 षटकात 9 बाद 157 (राहुल त्रिपाठी 30 चेंडूत 5 चौकार, 1 षटकारासह 44, निकोलस पूरन 24 चेंडूत 34, केन विल्यम्सन 16. अवांतर 10. अवेश खान 4-24, होल्डर 3-34, कृणाल पंडय़ा 2-27).