कतारमध्ये खेळल्या गेलेल्या फिफा विश्वचषक 2022 च्या अंतिम सामन्यात दोन वेळचे चॅम्पियन फ्रान्स आणि अर्जेंटिना यांच्यात झालेल्या रंगतदार मुकाबल्यानंतर अर्जेंटिनाने पेनल्टी शूटआउटमध्ये बाजी मारत विश्वचषकावर आपले नाव कोरले. विश्वचषकासाठी अंतिम लढाईत झुंजणाऱया लिओनेल मेस्सीच्या पायांनी अप्रतिम जादू दाखवली आणि अपेक्षित यश मिळवले. फ्रान्स सामना हरला तरीही पुढच्या काळातला जगज्जेता तो असेल आणि जगातील सर्वोत्तम खेळाडू त्यांच्याच संघातील असेल हे गोल्डन बूट जिंकणाऱया फ्रान्सच्या एम्बाप्पेने आपल्या खेळातून जगाला दाखवून दिले आहे. उपविजेतेपदावर समाधान मानावे लागलेल्या या संघाची पुढची काही वर्षे अर्जेंटिना, ब्राझीलप्रमाणेच उज्वल असतील हे त्यांच्या या युवा खेळाडूंनी सिद्ध केले आहे. आज संपूर्ण जगात टाळय़ांचा कडकडाट आणि अभिनंदनाचा वर्षाव होतो आहे तो लिओनेल मेस्सीवर. त्याचा संघ विश्वचषक जिंकून उगवता ठरला असला तरी मेस्सी आता मावळता ठरणार आहे. या विजयानंतर त्याने आपली निवृत्ती काही काळ पुढे ढकलली असली तरी पुढचा विश्वचषक खेळू शकेल का? याबद्दल आत्ताच सांगणे कठीण आहे. हीच झुंज त्याची अंतिम ठरणार असे बोलले जात होते. मात्र विजयानंतर त्याने निवृत्तीची शक्मयता फेटाळून लावली आहे. हे खरेतर आनंददायी आहे कारण एक सर्वोत्कृष्ट खेळाडू मैदानावर प्रदीर्घकाळ राहावा, अशी संपूर्ण जगाची इच्छा आहे. भारतीयांच्या दृष्टीने जशी सचिन तेंडुलकरच्या उपस्थितीत भारतीय क्रिकेट संघाने विश्वचषक क्रिकेट स्पर्धा जिंकावी अशी जनभावना होती आणि सचिनचे ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी संपूर्ण भारतीय क्रिकेट संघ झुंजला होता. त्या विजयानंतर ज्या जल्लोषात सचिनचे स्वागत झाले होते अगदी तसाच उत्साह आणि जल्लोष जगभर मेस्सीसाठी दाखवला गेला आहे. भारतासारख्या देशात जिथे प. बंगाल, गोवा, कोल्हापूर सारख्या ठराविक ठिकाणीच फुटबॉल खेळले जाते, अशा देशातही आनंदोत्सव साजरा केला जाणे हे आगळेच म्हटले पाहिजे. त्याच्या यशाने भारतीयांना सचिन तेंडुलकर आणि हॉकीचे जादूगार ध्यानचंद यांची आठवण झाल्या वाचून राहणार नाही. सचिनच्या कथेशी त्याच्या कथेचे असलेले साम्य हा एक मुद्दा झालाच तसेच मेजर ध्यानचंद यांच्या हॉकीच्या स्टिकला एक प्रकारची मॅग्नेट किंवा चुंबकीय शक्ती आहे, ज्यामुळे चेंडू त्यांच्याकडे गेला की दुसरा खेळाडूंना तो हिसकावून घेणे अवघड होते. तेच चेंडू सोडवत राहतात आणि यशस्वी होतात असे ध्यानचंद यांच्या बाबतीत म्हटले जाते. हॉकीचा जादूगार उपाधी त्यासाठीच त्यांच्यामागे लागली होती. अगदी तशीच जादू मेस्सीच्या पायामध्ये आहे. चेंडू त्याच्या पायात गेला की तो कोणाचेही प्रयत्न सफल होऊ देत नाही. अप्रतिम खेळाचा नमुना दाखवतो. आपल्या संघाला त्यातून यश मिळवून देतो हे जगाने पाहिले होते. त्याची व्यक्तिगत कामगिरी आणि सातत्यपूर्ण यश विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत मात्र कुठेतरी झाकोळले जात होते. या वेळच्या विजयाने ती राहिलेली कमतरताही आता दूर झाली आहे. आता त्याचा खेळ अधिक खुललेला आणि अधिक बिनधास्त बघायला मिळेल आणि तो आनंद जगभरातील क्रीडा रसिक घेतील यात शंकाच नाही. फुटबॉलमध्ये एकीकडे ब्राझील, इटली, जर्मनी, फ्रान्स अशा दिग्गज संघांना मागे पडताना जगाने पाहिले तसेच मोरोक्को, क्रोएशिया सारखे देश चमकतानाही पाहिले. जगातल्या अनेक देशांनी इतर राष्ट्रातील खेळाडू आपल्या संघातून खेळवून जगभर नावाजल्या जाणाऱया या खेळात आपलेही अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. भारतासारखा देश क्रिकेटमध्ये पुढे असला तरी जगभर प्रसिद्ध असणाऱया फुटबॉलसारख्या खेळात आजही मागे आहे. मात्र या खेळाचे चाहते भारतात किती आहेत ते या सामन्याच्या निमित्ताने मोठय़ा प्रमाणावर दिसून आले आहे. माध्यम क्रांतीमुळे आता हे सामने मोबाईलच्या स्क्रीनवर बघणेसुद्धा सोपे झाले आहे आणि त्याच पद्धतीने समजायची सोय प्रत्येकाला झाली आहे. त्यामुळे भारतासारख्या देशात भविष्यात हा खेळ फार मोठय़ा प्रमाणावर पसरला तर आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. कोल्हापूर सारख्या शहरात जगातल्या विविध देशांच्या फुटबॉल टीमचे चाहते दिसून येतात. प्रत्येक गल्ली कोपऱयावर आवडत्या फुटबॉल फोटोचा भव्य आकाराचा डिजिटल उभा करून त्याच्या संघाचा झेंडा आपल्या गल्लीत लावून दररोज सामन्यावेळी त्यांचे समर्थक म्हणून जल्लोष करणारे फुटबॉलप्रेमी कोल्हापूरकर संपूर्ण सामना काळात अनुभवायला मिळाले आहेत. अशाच पद्धतीने हा खेळ आपल्या भागात वाढत जाईल अशी स्थिती आहे. खेळाडूच्या शारीरिक क्षमतेची परीक्षा घेणारा आणि क्षणाक्षणाला रोमांचक होत जाणारा असा हा फुटबॉलचा खेळ संपूर्ण जगभर लोकप्रिय आहेच. पण भारतातही त्याचे चाहते वाढू लागले आहेत आणि त्यांची दखल घेणे गरजेचे आहे.
जगभर हा फुटबॉल सामना पाहण्यात लोक गुंतलेले दिसून आले. क्षणाला वाढणारी उत्कंठा आणि खेळातील शेवटच्या क्षणापर्यंत असलेली या सामन्याच्या निमित्ताने ही अनुभवता आली. मेस्सी ज्याच्याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले होते. पेले, मॅराडोना, रोनाल्डो, रोनाल्डीनो, झिदान अशा असंख्य खेळाडूंच्यावर जगाने यापूर्वी नजर रोखली होती. खेळतात कसे आणि विजयापर्यंत पोहोचतात कसे हे पाहण्यासाठी लोक अक्षरशः गर्दी करायचे. फुटबॉलचा आजवरचा इतिहास पाहिला, तर या खेळाडूंसह अनेकांनी एक काळ गाजविला. त्या त्या वर्ल्ड कपवर, काळावर त्यांचा अमीट ठसा उमटून राहिला. आता पुढचा काळ कुणाचा असेल, याचे उत्तर फ्रान्सच्या एम्बापे याने दिले. मेस्सीसारख्या प्रतिभावान खेळाडू व त्याच्या संघांविरोधात विरोधात त्याने जी एकाकी झुंज दिली, त्यातून तो उद्याचा हिरो असणार, हेच अधोरेखित होते. मागील विश्वचषकात त्याने फ्रान्सच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला होता. अवघ्या 23 वषीय एम्बापेने या वर्ल्ड कपमध्ये सगळय़ा जगावर मोहिनी घातली आहे. संपूर्ण जगाला रोमहर्षक खेळाची अनुभूती देणारा असा हा खेळ यापुढे भारताच्या भूमीत सुद्धा रुजला पाहिजे आणि त्या दृष्टीने यापुढे आपल्याकडे विचार झाला पाहिजे.