वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
स्पेनमधील व्हॅलेन्सीया येथे नुकत्याच झालेल्या आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या महिलांच्या 2022 सालातील नेशन्स चषक हॉकी स्पर्धेत अजिंक्यपद मिळविणाऱया भारतीय महिला हॉकी संघाचे सोमवारी येथे आगमन झाल्यानंतर त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. हॉकी इंडियातर्फे विजेत्या संघातील प्रत्येक खेळाडूला 2 लाख रुपयांचे बक्षिस जाहिर करण्यात आले आहे.
सविताच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला हॉकी संघाने स्पेनमधील या स्पर्धेत दर्जेदार कामगिरी करत अजिंक्यपद पटकाविले. या जेतेपदामुळे भारतीय महिला हॉकी संघाला 2023-24 च्या कालावधीत होणाऱया महिलांच्या प्रो लीग हॉकी स्पर्धेसाठी बढती मिळाली. 2022 चे वर्ष भारतीय महिला संघाला समाधानकारक गेल्याचे कर्णधार सविताने सांगितले आहे. यापुढे भारतीय महिला हॉकी संघ महत्त्वाच्या स्पर्धा जिंकण्यासाठी प्रयत्नशील राहिल. नेशन्स चषक हॉकी स्पर्धेत भारतीय महिला संघाने अंतिम सामन्यात यजमान स्पेनचा 1-0 अशा फरकाने पराभव करत जेतेपद मिळविले होते. गुरुजित कौरने हा एकमेव गोल नोंदविला.
स्पेनमधील या स्पर्धेत अजिंक्यपद मिळविणाऱया भारतीय महिला हॉकी संघाला हॉकी इंडियाकडून प्रत्येक खेळाडूला 2 लाख रुपयांचे बक्षिस जाहिर केले आहे. तसेच या स्पर्धेत भारतीय महिला हॉकी संघाबरोबर गेलेल्या प्रशिक्षक वर्गातील प्रत्येक सदस्याला 1 लाख रुपयांचे बक्षिस देण्यात येणार आहे. हॉकी इंडियातर्फे भारतीय महिला हॉकी संघाचे या कामगिरीबद्दल खास कौतुक आणि अभिनंदन केले आहे.