अनेकांची भागतेय भूक; दररोज हजारोंना लाभ : नाश्ता-भोजनाचा खर्च मनपाच्या तिजोरीतून
प्रतिनिधी / बेळगाव
मागील काही दिवसांपासून बंद असलेल्या इंदिरा कॅन्टीनना पुन्हा शहरात प्रतिसाद वाढला असून अनेक गरिबांचा आधार ठरत आहेत. लॉकडाऊन काळात अनेकांचे खाण्यापिण्याविना हाल होत आहेत. अशा संकटकाळात या योजनेचा उद्देश सफल होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून इंदिरा कॅन्टीन सुरळीत सुरू झाल्याने शहरातील स्थलांतरित मजूर, कष्टकरी व निराधारांना मोफत नाश्ता व जेवण उपलब्ध होत आहे. मध्यंतरीच्या काळात बंद झालेली इंदिरा कॅन्टीन पुन्हा जोमाने सुरू झाल्याने समाधान क्यक्त होत आहे.
शहरातील बसस्टॅण्ड रोड, एपीएमसी आवार, आझमनगर, जिल्हा रुग्णालय, गोवावेस, केएमएफ डेअरी, नाथ पै सर्कल आदी ठिकाणी ही कॅन्टीन उभारण्यात आली आहेत. लॉकडाऊनपूर्वी धूळखात पडलेल्या कॅन्टीनना प्रतिसाद वाढला असून नगरविकास खात्याच्या निर्णयानुसार नाश्ता आणि जेवण उपलब्ध करून दिले जात आहे. या कॅन्टीनमधून सकाळचा नाश्ता 5 रुपयांत तर दुपारचे जेवण 10 रुपयांत दिले जात होते. मध्यंतरी कॅन्टीनसाठी महापालिकेकडून मिळणारे अनुदान थांबले होते. त्यामुळे कॅन्टीन अडचणीत आली होती. मात्र, पुन्हा कोरोनाकाळात मोफत नाश्ता व जेवण दिले जात असल्याने नागरिकांचा प्रतिसाद वाढला असून अनेकांच्या पोटाचा प्रश्न मार्गी लागला आहे. या योजनेतील नाश्ता व भोजनाचा खर्च मनपाच्या तिजोरीतून होत असून कॅन्टीनमध्ये सीसीटीव्हीदेखील बसविण्यात आले आहेत.
शहरात स्थलांतरित मजुरांची संख्या अधिक आहे. शिवाय कष्टकरी कामगारांची संख्यादेखील अधिक आहे. मात्र, लॉकडाऊनमुळे शहरातील हॉटेल, खानावळी व सर्व काही बंद असल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. या परिस्थितीत इंदिरा कॅन्टीन अनेकांना आधार ठरताना दिसत आहेत. या कॅन्टीनमधून सकाळी नाश्त्यामध्ये इडली-पुलाव, दुपारच्या जेवणात भात, आमटी व रात्री पुलाव दिला जात आहे. जुन्या भाजी मार्केटजवळील कॅन्टीनमध्ये दररोज 300 जण नाश्ता तर 170 हून अधिक जण भोजनाचा आस्वाद घेत आहेत. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी पार्सल सुविधा उपलब्ध केली आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना सोयीस्कर झाले आहे.
पार्सल सुविधा उपलब्ध
कोरोनाकाळात इंदिरा कॅन्टीनमध्ये होणारी गर्दी टाळण्यासाठी कॅन्टीनमधून पार्सल सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. त्यामुळे एखादी व्यक्ती कॅन्टीनमध्ये येऊन तीन-चार लाभार्थ्यांचे जेवण घेऊन जाऊ शकते. त्यामुळे पार्सल सुविधा गर्दीच्या दृष्टिकोनातून सोयीस्कर ठरत आहे.