प्रतिनिधी/ पणजी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 70 व्या वाढदिवसानिमित्त भाजपतर्फे आयोजित करण्यात आलेल्या सेवा सप्ताहाचा ऑनलाईन पद्धतीने समारोप करण्यात आला. गोव्याचे प्रसिद्ध उद्योजक श्रीनिवास धेंपो, मुख्यमंत्री प्रमोद सावंत तसेच प्रदेश भाजप अध्यक्ष सदानंद तानावडे आणि इतर भाजप मंत्री, आमदार त्यावेळी उपस्थित होते.
श्री. धेंपो यांनी मोदींच्या एकंदरीत कार्याची स्तुती केली. त्यांनी देशभर केलेल्या लॉकडाऊनचे समर्थन करून त्याचा परिणाम म्हणून देशाचे नुकसान कमी झाल्याचे त्यांनी नमूद केले. अन्यथा आतापेक्षा जास्त नुकसान झाले असते. सर्व सरकारी लाभार्थी योजना मोदींनी ऑनलाईन केल्या आणि डिजिटल परिणाम घडवून आणला. त्यामुळे मधले दलाल संपले आणि लाभार्थीना त्यांचे पूर्ण पैसे बँक खात्यात मिळतात. देशाच्या सीमेवरही मोदींचे लक्ष असून ते तेथेही गेले व जवानांचे मनोबल वाढवले. सर्व देशांशी त्यांना मैत्रीचे संबंध हवे आहेत आणि त्या दृष्टीने त्यांनी काम चालविले आहे, असे सांगून श्री. धेंपो यांनी मोदींचे समर्थन केले.
डॉ. सावंत व श्री. तानावडे यांनीही मोदींसह भाजपच्या कार्यकर्त्यांच्या कामाचे कौतूक केले. पणजीतून हा कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीने साजरा करण्यात आला.