ऑनलाईन टीम / गोरखपूर :
देशभरात आज लॉक डाऊनचा पहिला टप्पा उठविण्यात आला आहे. यामध्ये ऑफिसेस, वाहतूक, मंदिरे खुली करण्यात आली आहेत. त्यानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज सर्वप्रथम गोरखनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, योगी आदित्यनाथ हे लॉक डाऊन उठवल्यानंतर गोरखपूर येथे दोन दिवसांच्या दौऱ्यावर आले आहेत. लॉक डाऊन नंतर प्रशासकीय कामे वगळता बाहेर पडले नव्हते. अगदी वडिलांच्या अंत्यसंस्कारालाही जायचे त्यांनी टाळले होते. यामागे कोणीही लॉक डाऊन च्या नियमांचे उल्लंघन करू नये आणि सर्वांनी नियमाचे पालन करावे अशी त्यांची इच्छा होती. यासाठी आपल्या आईला पत्र लिहून तसे कळवले होते.
दरम्यान, सोमवारी लॉक डाऊनचा पहिला टप्पा उघडल्यानंतर योगी यांनी गोरखनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेतले आहे. त्यानंतर त्यांनी दुर्गा मंदिरात रुद्राभिषेक केला. यावेळी संस्कृत विद्यालयाचे आचार्य आणि वेद पाठी ब्राह्मण यांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत हा विधी पार पाडला. योगी आदित्यनाथ यांनी रुद्राभिषेकाच्या माध्यमातून प्रदेश, देश आणि संपूर्ण जगाच्या कल्याणासाठी यावेळी प्रार्थना केली.