प्रतिनिधी/ चिकोडी
लोकशाहीत सर्व मतदारांनी सक्तीने मतदान करावे. आजच्या युवकांनी मतदानाबाबत ग्रामीण भागातील नागरिकांत जागृती करणे आवश्यक आहे. आजही समाजातील अनेकजण मतदान करण्याचे टाळतात. असे प्रकार करू नयेत. सर्वांनी मतदान करावे यासाठी युवकांनी जागृती करावी असे आवाहन तालुका पंचायतीचे कार्यकारी अधिकारी समीर मुल्ला यांनी केले.
शहरातील डायट सभा भवनात मतदार जागृती कार्यक्रमात विद्यार्थ्यांना उद्देशून ते बोलत होते. ते म्हणाले, विद्यार्थ्यांसाठी मतदानाबाबत जागृती व्हावी या उद्देशाने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. सध्या ग्रामीण भागात ग्राम पंचायत निवडणुका सुरू असून संविधानाने दिलेला मतदानाचा हक्क सर्वांनी वापरावा यासाठी युवकांनी जनजागृती करावी असे सांगितले. कार्यक्रमास गटशिक्षणाधिकारी बी. ए. मेकनमर्डी, अक्षरदासोह योजनेचे सहाय्यक संचालक के. बी. तळवार, बीआरपी जी. एम. सय्यद उपस्थित होते.