एनआयएने आवळला कारवाईचा फास, रात्री उशीरा केली अटक
प्रतिनिधी/ मुंबई
अँटिलियाजवळ स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ कारप्रकरणी चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्या सचिन वाझे यांनी अनेक गुन्हय़ांची कबुली एनआयएच्या अधिकाऱयांना दिली आहे. आपण या कटाचा एक भाग असल्याचे सांगत अनेकांची नावे घेतली आहे. या कबुलीजबाबामुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली असून शनिवारी आणखी तीन पोलीस अधिकाऱयांना ताब्यात घेण्यात आले आहे. शिवाय पाच अधिकारीही संशयाच्या जाळय़ात आहेत. एनआयएने शनिवारी दिवसभर केलेल्या विविध कारवाई आणि चौकशीसत्रामुळे अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. मुंबई पोलीस, एटीएस आणि ठाणे दलातील अधिकाऱयांचा यात समावेश आहे.
दरम्यान, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी वाझे प्रकरण गंभीर असल्याचा यापूर्वीच सांगितल्याचा दावा केला आहे. पोलीसच असे वागू लागल्यास राज्याची सुरक्षा धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही. एनआयएच्या तपासामुळे आणखी दोषींची नावे पुढे येतील, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. तर राऊत यांनी भाजप जाणीवपूर्वक सरकार अस्थिर करत असल्याचे म्हटले आहे.
वाझेकडून अनेक गुन्हय़ांची कबुली
एनआयएने पोलीस अधिकारी सचिन वाझेला शनिवारी रात्री उशिरा अटक केली. तत्पूर्वी चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर त्याने यासह अन्य गुह्याची कबुली देत आपण या कटाचा केवळ एक भाग असल्याचे सांगितल्याने या प्रकरणातून आणि चौकशीतून आणखी काय बाहेर पडणार ? याबाबत तर्क व्यक्त केले जात आहेत. तब्बल 13 तास सुरु असलेल्या या चौकशीमध्ये वाझे यानी अनेकांची नावे उघड केली आहेत. एनआयएने न्यायालयात अंबानी यांच्या घरासमोर सापडलेली स्फोटके कोठुन आली ? तसेच या कटात आणखी कोणा-कोणाचा समावेश आहे ? असे अनेक प्रश्न विचारले. अखेर ‘मी या कटाचा एक भाग असल्याची कबुली’ वाझे याने दिली. याशिवाय सर्वांत धक्कादायक आणि खेदजनक बाब म्हणजे मुंबई, एटीएस आणि ठाणे पोलीस दलातील 5 अधिकाऱयांचाही यात समावेश असल्याचे स्पष्ट होऊ लागले आहे. त्यामुळे हे अधिकारीही संशयाच्या भोवऱयात अडकल्याने मुंबई पोलिसांच्या प्रतिमेला तडा जाण्याची वेळ आली आहे.
13 तासांच्या चौकशीत अनेक बाबी उघड
शनिवारी एनआयएने 13 तासांच्या दीर्घकालीन चौकशीनंतर हॉलिडे न्यायालयात हजर केले. न्यायालायाने वाझे याला 25 मार्चपर्यंत एनआयए कोठडी दिली आहे. त्यानंतर एनआयएने आपली कारवाई आणखी गतीमान करत मुंबई पोलिसांच्या सीआययुच्या तीन अधिकाऱयांना ताब्यात घेतले आहे. यामध्ये वाझे याच्या जवळचे पोलीस निरीक्षक रियाज काझी याचा समावेश आहे. त्याचबरोबर आणखी दोन चालकांची चौकशी सुरु असून एका पोलीस उपायुक्ताकडे चौकशी केली जाणार असून त्याला ताब्यात घेतले जाण्याची शक्यता सुत्रांनी वर्तवली आहे.
संशयित इनोव्हा मुंबई पोलीस विभागाचीच
एनआयएने ऍटिलियाजवळ दिसलेली इनोव्हा ताब्यात घेतली असून ती पोलीस हेड ऑफिसमध्येही दिसून आली होती. अधिक चौकशी करता ही इनोव्हा क्राईम इंटेलिजेन्स यूनिटची असल्याचे समोर आले आहे. या इनोव्हाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी 800 सीसीटीव्ही फुटेज तपासले. 30 पेक्षा अधिक लोकांचे जबाब नोंदवले होते. याच गाडीचा वापर सचिन वाझे आणि त्याची टीम करीत होती. विशेष बाब म्हणजे घटनेनंतर ही इनोव्हा कोणाच्या नजरेत येऊ नये म्हणून दुरुस्तीचे कारण देत पोलिसांच्या मोटार ट्रान्स्पोर्ट विभागात पाठवण्यात आली होती, अशी माहितीही चौकशीमध्ये प्राप्त झाली आहे. या सर्व बाबींचा खुलासा झाल्याने आता अनेकजण एनआयएच्या कारवाईच्या टप्प्यात येण्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
सहायक निरीक्षक काझीसह दोन अधिकारी एनआयएच्या ताब्यात
सचिन वाझे याच्या जवळचे समजले जाणारे सहायक पोलीस निरीक्षक रियाज काझी व आणखी एका अधिकाऱयाला एनआयएने ताब्यात घेतले आहे. तसेच दोन चालकांचीही याप्रकरणी चौकशी सुरु आहे. दीर्घकालीन चौकशीसत्रामुळे मुंबई पोलीस, ठाणे पोलीस आणि राज्य एटीएसचे अधिकारीदेखील एनआयएचे लक्ष्य ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.