भाजपकडून ममता सरकारवर टीकेची झोड
वृत्तसंस्था/ कोलकाता
भाजप अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांच्या ताफ्यावरील हल्ल्यादरम्यान तैनात असलेल्या तीन आयपीएस अधिकाऱयांपैकी एकाला पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी सरकारने पदोन्नती दिली आहे.
नड्डा यांच्या ताफ्यावरील हल्ल्याप्रकरणी कारवाई करण्याऐवजी संबंधित अधिकाऱयाला बढती देण्यात आली आहे. ममता सरकारचे हे पाऊल चिथावणी देणारे आहे. भाजप नेत्यांवर हल्ला करणाऱयांना इनाम मिळणार असल्याचा संकेत यातून देण्यात आल्याचा आरोप भाजप नेते शहनवाज हुसैन यांनी केला आहे.
हल्ल्यादरम्यान तैनात असलेल्या तीन आयपीएस अधिकाऱयांसाठी केंद्रीय प्रतिनियुक्तीचा आदेश केंद्रीय गृहमंत्रालयाने दिला होता. या आदेशाच्या 15 दिवसांनी राज्य सरकारने एकाला बढती दिली आहे.
डायमंड हार्बर पोलीस अधीक्षक भोलानाथ पांडे यांची कमी महत्त्वाच्या पदावर बदली करण्यात आली आहे. तर पोलीस महानिरीक्षक (दक्षिण बंगाल) राजीव मिश्रा यांना याच विभागात अप्पर पोलीस महासंचालकपदी बढती देण्यात आली आहे. तर तिसरे आयपीएस अधिकारी उपमहानिरीक्षक प्रवीण कुमार त्रिपाठी अद्याप तेथेच तैनात आहेत.