प्रतिनिधी / पुलाची शिरोली
गुरुवारी रात्री साडेआठच्या सुमारास विजेचा लखलखाट होऊन सोसाट्याचा वारा सुटला आणि गारपीटीसह मोठा पाऊस झाला. यामध्ये औद्योगिक वसाहतीमधील सरोज फौंड्रीचे एचएमटी युनिट, सोनाई इंजिनिअरिंग, यश मेटॅलिक्स, साऊंड कास्टिंग्ज, आरएनडी इंडस्ट्रीज, हिंद गियर इंडस्ट्रीज, मणियार फॅब्रिकेटरँस , श्रीप्रसाद ऑटोमोबाईल, श्री स्वामी समर्थ सेल्स, रमाई इंजिनियर, आदी कारखान्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सुरक्षा रक्षकांमार्फत माहिती मिळताच उद्योजकांनी स्मॅकच्या माध्यमातून पोलिस प्रशासनाशी संवाद साधत औद्योगिक वसाहतीकडे धाव घेतली. नुकसानीचा आढावा घेत मर्यादित कामगारांच्या मदतीने उचकटलेल्या शेडची दुरुस्ती सुरू केली. वीज वितरण कंपनीकडून युध्द पातळीवर काम सुरू करण्यात आले आहे. मोठ्या प्रमाणात वीजेचे खांब वाकल्याने , झाडे पडल्यामुळे आणि विद्युत तारा तुटल्यामुळे वीज पुरवठा सुरू होण्यास अडचणी येत आहेत.
लॉकडाऊन मुळे उद्योग क्षेत्रात मोठे आर्थिक नुकसान होत आहे. यात भर म्हणून वळीव पावसाने हजेरी लावून उद्योग व्यवसायाला ही झोडपून काढले. हे नुकसान झालेले समजताच उद्योजक दिपक जाधव, शिरीष सप्रे, आनंद व अभिजीत देशपांडे, जयदत्त जोशिलकर आदींनी कंपनीमध्ये भेट देऊन नुकसानीची पहाणी केली. व कामगारांना सुचना दिल्या.