मुंबई-गोवा महामार्गावर हातखंबा येथे कारवाई
प्रतिनिधी/ रत्नागिरी
अंटार्क्टिक महासागर परिसरात वालरस आढळतात. पण त्या प्राण्यांच्या दातांची तस्करी करणारे तिघेजण रत्नागिरी वनविभाग व पोलिसांच्या संयुक्त सापळय़ात अडकले. मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा येथे या तस्करी करणाऱया तिघांच्या मुसक्या वनविभागाच्या पथकाने मंगळवारी रात्री आवळल्या.
या प्रकरणी मुहमंद नुमान यासिन नाईक (42, रा. गोवा), हेमंत सुरेश कांडर (38, रा. बावशी ता. कणकवली जि. सिंधुदुर्ग), राजन दयाळ पांगे (58, रा. पारवाडी आचरे ता. मालवण जि. सिंधुदुर्ग) या तिघांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत दुर्मीळ समजल्या जाणाऱया वालरस प्राण्यांचे दात, वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली कार वनविभागाच्या पथकाने जप्त केली आहे. वालरसच्या दातांची किंमत जागतिक बाजारपेठेत मोठी आहे. पण ते दात या तिघांना नेमके कोठून मिळाले, ते त्यांची विक्री कुठे करणार होते, याचा शोध घेण्याचे आव्हान वनविभागासमोर उभे आहे. परिक्षेत्र वन अधिकारी प्रियंका लगड यांना त्यांच्या खास खबऱयाने दिलेल्या माहितीनुसार, सिंधुदुर्ग जिह्यातून तिघे वालरस या दुर्मीळ प्राण्याच्या दातांची तस्करी करणार असल्याची खबर मिळाली हाती.
त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांच्या मदतीने सापळा लावण्यात आला होता. मंगळवारी रात्री 9 च्या सुमारास सिंधुदुर्गहून मुंबईच्या दिशेने जाणारी कार पथकाने अडवून गाडीची झडती घेतली. यावेळी गाडीत वालरस या दुर्मीळ प्राण्याचे दात आढळून आले. त्यानंतर वन व पोलिसांच्या पथकाने मुहमंद नुमान यासिन नाईक, हेमंत सुरेश कांडर, राजन दयाळ पांगे या तिघांना अटक करण्यात आली आहे. या तिघांविरूद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अन्वये, गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कामगिरी कोल्हापूर मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) डॉ. व्ही. क्लेमेंट बेन, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग, विभागीय वनाधिकारी दीपक खाडे, सहा. वनसंरक्षक सचिन निलख व पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांच्या मार्गदर्शनाखाली परिक्षेत्र वनाधिकारी प्रियंका लगड, रत्नागिरी (चिपळूण) वनक्षेत्रपाल फिरते पथक राजेंद्र पाटील, सातारा वनक्षेत्रपाल फिरते पथक सचिन नानासाहेब डोंबाळे, लांजा वनपाल दिलीप आरेकर, पाली वनपाल गौतम कांबळे, वनरक्षक सागर पताडे, संजय रणधीर, आकाश कडूकर, राहूल गुंठे, राजाराम पाटील, विक्रम कुंभार, सुरज तेली तसेच पोलीस हे. कॉ. प्रशांत बोरकर, पोलीस हे.कॉ. शांताराम झोरे, पोलीस हे.कॉ. बाळू पालकर, हाईड लाईफ क्राईम कंट्रोल ब्युरोचे विजय नांदेकर, साताराचे मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटय़े यांनी केली.