साडेसात टक्के आरक्षणात वाढ करण्याची मागणी
प्रतिनिधी/ बेळगाव
कर्नाटकामध्ये वाल्मिकी नायक समाज मोठय़ा संख्येने आहे. हा समाज अत्यंत मागासलेला आहे. त्यामुळे या समाजाच्या आरक्षणामध्ये वाढ करावी, या मागणीसाठी बेळगाव जिल्हा वाल्मिकी नायक समाज व अखिल कर्नाटक वाल्मिकी नायक महासभा बेंगळूर यांच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडण्यात आले.
वाल्मिकी समाज सर्वच क्षेत्रामध्ये मागासलेला आहे. सामाजिक आर्थिक, शैक्षणिक मध्ये प्रगती झाली नाही. या समाजाला नोकरीमध्येही योग्य प्रकारे आरक्षण दिले जात नाही. त्यामुळे अन्याय होत असून प्रत्येक क्षेत्रात आम्हाला 7.5 टक्के आरक्षण द्यावे, अशी मागणी करत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन छेडण्यात आले.
राज्यामध्ये 40 लाखांच्या आसपास या समाजाची जनसंख्या आहे. ही जनसंख्या मोठी असून 7.5 टक्के आरक्षण द्यावे. त्यामध्ये इतर कोणालाही आरक्षण देवू नये, अशी मागणी करण्यात आली आहे. नाग महोनदास आयोग देखील लागू करावा, अशी मागणी देखील त्या निवेदनात नमूद करण्यात आली. वाल्मिकी समाजाची आजपर्यंत प्रगती झाली नाही. कारण या समाजाला न्याय देण्यात आला नाही. या समाजाला आतापर्यंत कोणत्याच सरकारने मदत केली नाही. तेंव्हा आम्हाला न्याय द्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन करु, असा इशारा देण्यात आला आहे. यावेळी राजेश तळवार यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.