प्रतिनिधी / वास्को
वास्को रेल्वे स्थानकानजीकचा सर्वात जुना उड्डाण पदपुल सावर्जनिक वापरासाठी काल गुरूवारपासून बंद करण्यात आला आहे. रेल्वेने कोणतीही पूर्वसुचना न देता पुल बंद केल्याने लोकांमध्ये गोंधळ उडाला. शेकडो लोकांना गैरसोय सहन करावी लागली. लोकांमध्ये नाराजी पसरलेली आहे. मात्र, रेल्वेने हा पुल असुरक्षीत असल्याचे आढळून आल्याने बंद केल्याचे म्हटले आहे.
वास्को शहरातील स्वातत्र पथ मार्ग ते बायणातील माता सेकंडरी स्कुलला जोडणारा रेल्वे उड्डाण पदपुल रेल्वे स्थानकानजीकच आहे. वास्कोतील रेल्वे मार्गावर बायणाला जोडणारे दोन उड्डाण पदपुल आहेत. तर एक पुल मेस्तावाडा ड्रायवरहिल भागाला जोडणारा आहे. हे तीन्ही पुल लोखंडी आहेत. या तीन पुलापैकी बायणातील माता सेकंडरी स्कुलपर्यंत जोडला गेलेला पदपुल सर्वात पहिला असून तो जवळपास पन्नास वर्षे जुना आहे. काही वेळा त्याची दुरूस्तीही झालेली आहे. मागची पन्नास वर्षे हा पुल बायणातील लोकांसाठी आधार बनून राहिलेला आहे. लोकांकडे आजच्या सारखी वाहने नव्हती अशा काळात हा एकमेव पुलच हजारो लोकांना वास्को येण्या जाण्यासाठी एकमेव आधार होता. सध्याच्या काळातही दिवसा शेकडो लोक या पदपुलावरून ये जा करीत असतात.
काल गुरूवारी सकाळी हा पुल पादचाऱयांसाठी खुला होता. मात्र, दुपारी हा पुल बंद करण्यात आल्याचे दिसून आल्याने या वाटेवरील पादचाऱयांना धक्काच बसला. कुठून वाट काढावी हेच लोकांना समजेना. शेवटी लोकांनी वास्को ते बायणा रस्त्याची वाट धरली. आयओसी नाक्यावर असलेल्या दुसऱया पदपुलापर्यंत लोकांना पायपीट करावी लागली. पूल बंद करण्यात येणार असल्याची पूर्वसुचना रेल्वेने जनतेला दिली नव्हती. त्यामुळे लोकांचा गोंधळ उडाला. या पुलाचा वास्को शहरात कामधंदय़ानिमित्त तसेच बाजारहाटीसाठी येणाऱया लोकांना आधार होता. आता हा पुल खुला होण्याची शक्यता दिसत नसल्याने लोकांची मोठी गैरसोय होणार आहे. या पुलाच्या बायणातील पायथ्याशी माता शाळा आहे. या शाळेत मुरगाव म्युनसिपल हायस्कुलचे वर्गही भरत आहेत. या विद्यार्थ्यांनाही याच पुलाचा आधार होता. हे विद्यार्थीही आता अडचणीत सापडले आहेत.
रेल्वेने पुलाच्या प्रवेशव्दारावर पत्रे लावून पुलाची वाट दोन्ही बाजुनी कायमची बंद केली आहे. हा पुल सार्वजनिक वापरासाठी असुरक्षीत वाटत असल्याने तो बंद करण्यात येत असल्याचा एक फलक रेल्वेने त्या पत्र्यांवर लावलेला आहे.