वृत्तसंस्था/ ढाका
येथे सुरू असलेल्या दुसऱया आणि शेवटच्या कसोटीत शुक्रवारी खेळाच्या दुसऱया दिवशी यजमान बांगलादेशविरुद्ध विंडीजने पहिल्या डावात 409 धावांचा डोंगर उभा केला. विंडीजतर्फे बॉनेर, डिसिल्वा आणि जोसेफ यांनी अर्धशतके झळकविली. दिवसअखेर बांगलादेशची स्थिती पहिल्या डावात 4 बाद 105 अशी केविलवाणी झाली आहे.
दोन सामन्यांच्या या मालिकेत विंडीजने पहिली कसोटी जिंकून बांगलादेशवर यापूर्वीच आघाडी घेतली आहे. या दुसऱया कसोटीत विंडीजने 5 बाद 223 या धावसंख्येवरून खेळाला पुढे सुरुवात केली आणि त्यांच्या शेवटच्या 5 गडय़ांनी 186 धावांची भर घातली. विंडीजतर्फे 3 फलंदाजांनी अर्धशतके झळकविली. बॉनेरने 209 चेंडूत 90, जोशुआ दा सिल्वाने 187 चेंडूत 92 तर अल्झारी जोसेफने 108 चेंडूत 82 धावा जमविल्या. दा †िसल्वा आणि जोसेफ यांनी सातव्या गडय़ासाठी 118 धावांची भर घातली. 142.2 षटकात विंडीजचा पहिला डाव 409 धावांवर आटोपला. बांगलादेशतर्फे अबु झायेद आणि तैजुल इस्लाम यांनी प्रत्येकी 4 तर मेहदी हसन मिराज आणि सरकार यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
यजमान बांगलादेशच्या पहिल्या डावाला चांगली सुरुवात झाली नाही. पहिल्या षटकातील शेवटच्या चेंडूवर गॅब्रिएलने सौम्या सरकारला खाते उघडण्यापूर्वीच झेलबाद केले. त्यानंतर गॅब्रिएलने बांगलादेशला आणखी एक धक्का देताना नजमुल हुसेनला 4 धावांवर बाद केले. तमिम इक्बाल आणि कर्णधार मोमीनूल हक यांनी तिसऱया गडय़ासाठी 58 धावांची भर घातली. जोसेफने तमिम इक्बालला 44 धावांवर झेलबाद केले तर कॉर्नवॉलने कर्णधार मोमीनूल हकला 21 धावांवर झेलबाद केले. दिवसअखेर रहीम 27 तर मिथुन 6 धावांवर खेळत आहेत. 36 षटकात बांगलादेशने 4 बाद 105 धावा जमविल्या. विंडीजतर्फे गॅब्रिएलने 2 तर कॉर्नवॉल आणि जोसेफ यांनी प्रत्येकी 1 बळी मिळविला. बांगलादेशचा संघ अद्याप 304 धावांनी पिछाडीवर असून त्यांचे 6 गडी खेळायचे आहेत. या सामन्यात विंडीजची स्थिती अधिक भक्कम झाली असून आता ते एकतर्फी मालिका विजय मिळविण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहेत.
संक्षिप्त धावफलक
विंडीज प. डाव- 142.2 षटकात सर्वबाद 409 (दा सिल्वा 92, बॉनेर 90, जोसेफ 82, ब्रेथवेट 47, कॅम्पबेल 36, ब्लॅकवूड 28, अबू झायेद 4/98, तैजुल इस्लाम 4/108, मिराज 1/75, सरकार 1/48), बांगलादेश प. डाव- 36 षटकात 4 बाद 105 (तमिम इक्बाल 44, सरकार 0, नजमूल हुसेन 4, मोमीनूल हक 21, रहीम खेळत आहे 27, मिथुन खेळत आहे 6, गॅब्रिएल 2/31, कॉर्नवॉल 1/18, जोसेफ 1/34).