वृत्त संस्था/ ढाक्का
येथे सुरू असलेल्या दुसऱया आणि शेवटच्या कसोटीत शनिवारी खेळाच्या तिसऱया दिवसाअखेर विंडीजने यजमान बांगलादेशवर 154 धावांची आघाडी मिळविली आहे. बांगलादेशच्या पहिल्या डावात विंडीजच्या कॉर्नवलने 74 धावांत 5 गडी बाद केले. दिवसअखेर विंडीजची दुसऱया डावात स्थिती 3 बाद 41 अशी केविलवाणी झाली आहे.
दोन सामन्यांच्या या कसोटी मालिकेत विंडीजने पहिली कसोटी जिंकून बांगलादेशवर 1-0 अशी आघाडी यापूर्वीच घेतली आहे. या दुसऱया कसोटीत विंडीजने पहिल्या डावात 409 धावांचा डोंगर उभा केल्यानंतर बांगलादेशने पहिल्या डावात 296 धावा जमविल्या. लिटॉन दासने 133 चेंडूत 71, रहीमने 105 चेंडूत 64, मिराजने 140 चेंडूत 57 आणि तमीम इक्बालने 52 चेंडूत 44 तसेच मिथुनने 15, कर्णधार मोमिनूल हकने 21 आणि टी इस्लामने नाबाद 13 धावा जमविल्या. विंडीजतर्फे कॉर्नवॉलने 74 धावांत 5, गॅब्रियलने 70 धावांत 3 आणि जोसफने 60 धावांत 2 गडी बाद केले. विंडीजने पहिल्या डावात 113 धावांची आघाडी मिळविली. बांगलादेशचा पहिला डाव खेळाच्या शेवटच्या सत्रातील एक तास बाकी असताना 96.5 षटकांत 296 धावांवर आटोपला.
विंडीजच्या दुसऱया डावाला चांगली सुरूवात झाली नाही. दिवसअखेर विंडीजने दुसऱया डावात 21 षटकांत 3 बाद 41 धावा जमविल्या. बांगलादेशच्या नईम हसनने कर्णधार क्रेग ब्रेथवेटला 6 धावांवर झेलबाद केले. त्यानंतर मेहदी हसनने मोसेलीला 7 धावांवर बाद केले. ताजुल इस्लामने कँपबेलचा 18 धांवावर त्रिफळा उडविला. बॉनेर 8 तर वेरीकेन 2 धांवावर खेळत आहे. बांगलादेशतर्फे ताजुल इस्लाम, नईम हसन आणि मेहदी हसन यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक
विंडीज प. डाव-409, बांगलादेश प. डाव 296 (लिटॉन दास 71, मेहदी हसन 57, रहीम 54, तमीम इक्बाल 44, मोमिनूल हक 21, मिथून 15, टी इस्लाम नाबाद 13, कॉर्नवॉल 5-74, गॅब्रियल 3-70, जोसेफ 2-60), विंडीज दु. डाव- 21 षटकांत 3 बाद 41 (ब्रेथवेट 6, कँपबेल 18, मोसेली 7, बॉनेर खेळत आहे 8, वेरीकेन खेळत आहे 2, टी इस्लाम, नईम हसनआणि मेहदी हसन प्रत्येकी एक बळी).