मँचेस्टर / वृत्तसंस्था
येथील ओल्ड ट्रफोर्ड स्टेडियमवर सुरु असलेल्या यजमान इंग्लंड-विंडीज यांच्या कसोटी सामन्यात शनिवारी तिसऱया दिवशी उशिरापर्यंत खेळ सुरु होऊ शकला नव्हता. 3 कसोटी सामन्यांच्या या मालिकेत विंडीजचा संघ 1-0 फरकाने आघाडीवर असून येथील लढतीत इंग्लंडचा संघ वर्चस्व गाजवण्यासाठी अधिक प्रयत्नशील आहे. शुक्रवारी सामन्याच्या दुसऱया दिवशी इंग्लंडने पहिला डाव 9 बाद 469 धावांवर घोषित केल्यानंतर विंडीजने 1 बाद 32 धावा अशी सुरुवात केली. शनिवारी उपाहारापर्यंत एकाही चेंडूचा खेळ होऊ शकला नव्हता. दरम्यान, इंग्लंड व वेल्स क्रिकेट मंडळाने स्पीडस्टार जोफ्रा आर्चरवर दंडात्मक कारवाई व कडक समज देत त्याला तिसऱया कसोटीत खेळण्याची संमती दिली आहे. पहिल्या कसोटीनंतर परवानगी न घेता घरी गेल्याने शिस्तभंग केल्याचा ठपका त्याच्यावर होता. आर्चरने याबाबत यापूर्वीच दिलगिरी व्यक्त केली होती.